नुकताच IPL ला बारावा हंगाम पार पडला. शेवटच्या चेंडूपर्यत रंगलेल्या अंतिम सामन्यात मुंबईने चेन्नईला १ धावेने पराभूत केले आणि IPL विजेतेपदाचा चौकार लगावला. मुंबईने प्रथम फलंदाजी करत चेन्नईला १५० धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला एका चेंडूंत २ धावा हव्या होत्या. पण अनुभवी लसिथ मलिंगाने शेवटच्या चेंडूवर गडी बाद केला आणि मुंबईला विजेतेपद मिळवून दिले. अटीतटीच्या या लढतीत राहुल चहर आणि जसप्रीत बुमराह यांची गोलंदाजीही अत्यंत निर्णायक ठरली.

आता यानंतर विश्वचषक स्पर्धेची ओढ सर्व क्रिकेटप्रेमींना लागली आहे. या दरम्यान, चेन्नईचा कर्णधार असलेला महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षीही IPL स्पर्धा खेळेल असा विश्वास चेन्नई सुपर किंग्ज संघाचे CEO विश्वनाथन यांनी स्पष्ट केले. “महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी दमदार पुनरागमन करेल याची आम्हाला खात्री आहे. गेली दोन वर्षे धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा रंगत आहेत. पण धोनीने या चर्चांकडे दुर्लक्ष केले आहे. इतकेच नव्हे तर धोनीने गेल्या दोनही IPL मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. २०१८ साली आम्ही विजेतेपद मिळवले. यंदाच्या वर्षी आम्हाला १ धावेने पराभव पत्करावा लागला, पण धोनीची कामगिरी नक्कीच उल्लेखनीय होती. त्यामुळे कितीही चर्चा रंगल्या तरीही नो टेन्शन.. धोनी पुढच्या वर्षीदेखील खेळणार हे नक्की”, असे विश्वनाथन म्हणाले.

दरम्यान, अंतिम सामन्यात १५० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर फाफ डु प्लेसिस याने तुफान फटकेबाजीला सुरुवात केली. पण लवकर बाद झाला. कर्णधार धोनीही २ धावा करून माघारी परतला. शेन वॉटसनने संयमी खेळी करत झुंजार अर्धशतक ठोकले. त्याने ८० धावा केल्या. सामना अत्यंत अटीतटीचा झाला असताना शेवटच्या चेंडूवर मलिंगाने फलंदाजाला पायचीत करत मुंबईला विजय मिळवून दिला.

त्याआधी मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. सलामीवीर डी कॉकने १७ चेंडूत २९ धावा केल्या. खेळपट्टीवर स्थिरावलेला ईशान किशन मोठा फटका खेळताना झेलबाद झाला. त्याने २६ चेंडूत २३ धावा केल्या. अखेर Birthday Boy कायरन पोलार्डने शेवटच्या टप्प्यात फटकेबाजी करत मुंबईला १४९ धावांपर्यंत पोहोचवले. पोलार्डने ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने २५ चेंडूत नाबाद ४१ धावा केल्या.

Story img Loader