IPL 2019 Final MI vs CSK : शेवटच्या चेंडूपर्यत रंगलेल्या अंतिम सामन्यात मुंबईने चेन्नईला १ धावेने पराभूत केले आणि IPL विजेतेपदाचा चौकार लगावला. मुंबईने प्रथम फलंदाजी करत चेन्नईला १५० धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला एका चेंडूत २ धावा हव्या होत्या. पण अनुभवी लसिथ मलिंगाने शेवटच्या चेंडूवर गडी बाद केला आणि मुंबईला विजेतेपद मिळवून दिले. अटीतटीच्या या लढतीत राहुल चहर आणि जसप्रीत बुमराह यांची गोलंदाजीही अत्यंत निर्णायक ठरली.
या सामन्यात चेन्नईकडून शेन वॉटसनने एकाकी झुंज दिली. एका बाजूने गडी बाद असताना शेन वॉटसनचे मात्र संयमी खेळी करत झुंजार अर्धशतक ठोकले. अर्धशतकानंतर त्याने तुफान फटकेबाजी केली पण दुहेरी धाव घेताना तो शेवटच्या षटकात ८० धावांवर धावचीत झाला. त्याने ५९ चेंडूत ८० धावा केल्या. पण महत्वाचे म्हणजे ही खेळी त्याने पायाला दुखापत झालेली असताना आणि त्या जखमेतून रक्त वाहत असताना केली. चेन्नई संघाचा फिरकीपटू हरभजन सिंग याने याबाबत माहिती दिली.
त्यानंतर शेन वॉटसनचे केवळ चेन्नईच्याच नव्हे तर सर्व क्रिकेटचाहत्यांनी कौतुक केले आणि त्याला पाठिंबा दर्शविला. चाहत्यांचे प्रेम आणि पाठिंबा पाहून शेन वॉटसन भावूक झाला आणि त्याने एका व्हिडिओच्या माध्यमातून एक भावनिक संदेश दिला.
“गेल्या काही दिवसात चाहत्यांनी मला जे प्रेम दिले आणि ज्या प्रकारचा पाठिंबा दर्शविला ते पाहून मी खूपच भावूक झालो आहे. अंतिम सामना अत्यंत अटीतटीचा झाला. या सामन्यात चेन्नईसाठी मला सामना जिंकता आला नाही. मुंबईला विजेतेपद मिळाले. पण पुढील वर्षी आम्ही दमदार पुनरागमन करू”, असे वॉटसन म्हणाला.
हे वाचा – IPL 2019 Final : लढवय्या! रक्तबंबाळ पायाने वॉटसन अखेरपर्यंत लढला…
हरभजन सिंग याने याबाबत माहिती दिली होती. “त्याच्या (वॉटसन) गुडघ्याजवळ असलेलं रक्त तुम्ही पाहू शकता का? सामन्यानंतर वॉटसनला तब्बल ६ टाके पडले. मैदानावर डाइव्ह मारताना त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली, पण कोणालाही काहीही न सांगता वॉटसन एकटा खेळत राहिला”, असे हरभजनने इंस्टाग्रामच्या स्टोरीवर लिहिले आहे. या बरोबरच त्याने वॉटसनच्या खेळीचीही स्तुती केली होती.
दरम्यान, १५० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर फाफ डु प्लेसिस याने तुफान फटकेबाजीला सुरुवात केली. पण लवकर बाद झाला. कर्णधार धोनीही २ धावा करून माघारी परतला. शेन वॉटसनने संयमी खेळी करत झुंजार अर्धशतक ठोकले. त्याने ८० धावा केल्या. सामना अत्यंत अटीतटीचा झाला असताना शेवटच्या चेंडूवर मलिंगाने फलंदाजाला पायचीत करत मुंबईला विजय मिळवून दिला.
त्याआधी मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. सलामीवीर डी कॉकने १७ चेंडूत २९ धावा केल्या. खेळपट्टीवर स्थिरावलेला ईशान किशन मोठा फटका खेळताना झेलबाद झाला. त्याने २६ चेंडूत २३ धावा केल्या. अखेर Birthday Boy कायरन पोलार्डने शेवटच्या टप्प्यात फटकेबाजी करत मुंबईला १४९ धावांपर्यंत पोहोचवले. पोलार्डने ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने २५ चेंडूत नाबाद ४१ धावा केल्या.