IPL च्या क्वालिफायर २ सामन्यात चेन्नईने दिल्लीच्या संघावर ६ गडी राखून मात केली आणि स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. दिल्लीच्या संघाने विजयासाठी चेन्नईला १४८ धावांचे माफक आव्हान दिले होते. चेन्नईचे सलामीवीर शेन वॉटसन आणि फाफ डु प्लेसिस या दोघांच्या अर्धशतकांच्या जोरावर चेन्नईने सहज विजय मिळवला. आता स्पर्धेच्या विजेतेपदासाठी चेन्नईला मुंबईशी झुंजावे लागणार आहे.

उत्साहाने परिपूर्ण असेलला दिल्लीचा संघ २०१२ सालानंतर प्रथमच प्ले ऑफ्स गटात पोहोचला होता. याबाबत योगायोग म्हणजे २०१२ साली क्वालिफायर २ या सामन्यात दिल्लीच्या संघापुढे चेन्नईचेच आव्हान होते. पण त्या सामन्यात चेन्नईकडून दिल्लीला पराभवाचा सामना करावा लागला होता. प्रथम फलंदाजी करताना मुरली विजयच्या (११३) शतकाच्या जोरावर चेन्नईने २२२ धावा ठोकल्या होत्या. तर दिल्लीला प्रत्युत्तरात केवळ १३६ धावत करता आल्या होत्या. त्यामुळे तब्बल ७ वर्षांनी स्पर्धेच्या अगदी समान टप्प्यावर दिल्लीला चेन्नईकडून झालेल्या ‘त्या’ पराभवाचा वचपा काढण्यासाठी संधी होती. पण इतिहासाची पुनरावृत्ती झाली आणि चेन्नईने पुन्हा दिल्लीचे अंतिम फेरीचे स्वप्न धुळीस मिळवले.

या सामन्यात १४८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सुरुवातीची षटके जपून खेळल्यानंतर फाफ डु प्लेसिस आणि वॉटसन यांनी चेन्नईला धमाकेदार सुरुवात मिळवून दिली. या दोघांनी आठव्या षटकात चेन्नईला अर्धशतकी सलामी करून दिली. यात डु प्लेसिसने फटकेबाजी केली, तर वॉटसनने संयमी पवित्रा राखला. आपली फटकेबाजी सुरु ठेवत फाफ डु प्लेसिस याने दमदार अर्धशतक पूर्ण केले. यासाठी त्याने ३७ चेंडू खेळले. डु प्लेसिसने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर लगेचच चेन्नईला धक्का बसला. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात डु प्लेसिस झेलबाद झाला. त्याने ३९ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकार लगावत ५० धावा केल्या. त्याने वॉटसन बरोबर ८१ धावांची सलामी दिली.

आधी संयमी खेळी आणि नंतर तुफानी अर्धशतक ठोकल्यानंतर शेन वॉटसन माघारी परतला. त्याने ३ चौकार आणि ४ षटकार यांच्या मदतीने ३२ चेंडूत ५० धावा केल्या. पाठोपाठ बाचकत फलंदाजी करणारा सुरेश रैनाही स्वस्तात तंबूत परतला. त्याने केवळ ११ धावा केल्या. विजयासाठी २ धावा आवश्यक असताना धोनीला विजयी षटकार मारण्याचा मोह आवरला. त्यातच तो बाद झाला. अखेर रायडूने विजयी फटका लगावत विजयाची औपचारिकता पूर्ण केले.

नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा धोनीचा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. दिल्लीची फलंदाजी पुरती कोलमडली. ऋषभ पंत आणि कॉलिन मुनरोचा अपवाद वगळता दिल्लीचे फलंदाज चेन्नईच्या गोलंदाजीचा सामना करु शकले नाहीत. सलामीवीर पृथ्वी शॉला माघारी धाडत दिपक चहरने दिल्लीला पहिला धक्का दिला. यानंतर शिखर धवनही हरभजन सिंहच्या गोलंदाजीचा शिकार होऊन माघारी परतला. यानंतर प्रत्येक फलंदाज एका मागोमाग एक माघारी परतत राहिल्यामुळे दिल्लीचा संघ भागीदारी उभारु शकला नाही. मधल्या फळीत ऋषभ पंतने फटकेबाजी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ही मोठी खेळी करु शकला नाही. त्याने दिल्लीकडून ३८ धावा केल्या.

चेन्नईकडून दिपक चहर, हरभजन सिंह, रविंद्र जाडेजा, ड्वेन ब्राव्हो यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. इम्रान ताहीरने १ बळी घेत त्यांना चांगली साथ दिली.

Story img Loader