2019 सालात मार्च महिन्याच्या अखेरीस सुरु होणाऱ्या आयपीएलच्या बाराव्या हंगामाआधी, मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसीठी एक चिंता करायला लावणारी बातमी आलेली आहे. मुंबई इंडियन्सचा महत्वाचा गोलंदाज जसप्रीत बुमराह यंदा आयपीएलला मुकण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या अखेरीस इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. यासाठी भारतीय संघातील प्रमुख गोलंदाजांना आयपीएलमध्ये न खेळण्याची सूट देण्यात यावी अशी मागणी काही दिवसांपूर्वी विराट कोहलीने बीसीसीआयकडे केली होती. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने यासंदर्भात आयपीएल संघमालकांशी बोलण्याचं ठरवलं आहे.
जसप्रीत बुमराहवर अतिक्रिकेटमुळे येणारा ताण याविषयावर बीसीसीआयचे अधिकारी आयपीएलच्या संघमालकांशी बोलणार आहेत. याचसोबत संघमालकांनी बुमराहला खेळवण्यावर भर दिला, तर आगामी विश्वचषक स्पर्धा लक्षात घेता त्याची महत्वाच्याच सामन्यांसाठी निवड केली जावी अशी अटही बीसीसीआय घालणार असल्याचं समजतंय. यासाठी भारतीय संघाचे फिजीओ व इतर वैद्यकीय अधिकारी यांना बुमराहच्या तंदुरुस्तीविषयीचा अहवाल तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संघमालकांनी सामंजस्याची भूमिका घेतल्यास यावर सहज तोडगा निघू शकतो असं मत बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर व्यक्त केलं आहे. जसप्रीत बुमराहसोबत, विराट कोहली, रोहित शर्मा, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, हार्दिक पांड्या या खेळाडूंबद्दलही बीसीसीआय अशाच प्रकारचा निर्णय घेऊ शकत, अशी माहिती सुत्रांनी दिलेली आहे.
अवश्य वाचा – जाणून घ्या भारतीय क्रिकेट संघाचे 2019 सालचे वेळापत्रक