आयपीएलच्या बाराव्या हंगामात, चेन्नई सुपरकिंग्जने मोठ्या धडाक्यात सुरुवात केली आहे. आपले सलामीचे दोन्ही सामने जिंकत, गतविजेत्या चेन्नईने या हंगामातही आपण विजयाचे मुख्य दावेदार असल्याचं दाखवून दिलंय. घरच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात चेन्नईने बंगळुरुवर मात केली. तर फिरोजशहा कोटला मैदानावरील सामन्यात चेन्नीने दिल्लीवर विजय मिळवला. या विजयानंतर संपूर्ण संघाने आपला सहकारी केदार जाधवच्या वाढदिवसानिमीत्त केक कापला. चेन्नईच्या संघाचं हे सेलिब्रेशन सध्या सोशल मीडियावर चांगलं व्हायरल होतं आहे.
पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये केदार जाधवने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. चेन्नईच्या सर्व सहकाऱ्यांनी केदारचा टी-शर्ट उतरवत त्याच्या संपूर्ण शरिराला केक लावला. या सेलिब्रेशनचे फोटोही सोशल मीडियावर टाकण्यात आलेले आहेत. मागच्या हंगामात केदार जाधवला पहिल्या सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे संपूर्ण हंगामाला मुकावं लागलं होतं. मात्र यंदाच्या हंगामात त्याने चांगली सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये केदार जाधव कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
अवश्य वाचा – Video : “घरी परत जायचा विचार आहे का?” जेव्हा धोनी केदार जाधवची फिरकी घेतो