घरच्या मैदानावर खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने सलग दुसऱ्या सामन्यात विजयाची नोंद केली आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब संघावर 28 धावांनी मात करत कोलकात्याने आपला दुसरा विजय नोंदवला. 219 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेला पंजाबचा संघ 20 षटकात 190 धावांपर्यंतच मजल मारु शकला. कोलकात्याच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा करत, पंजाबजच्या फलंदाजांना सामन्यात डोकं वर काढण्याची संधीच दिली नाही. पंजाबकडून मयांक अग्रवाल आणि डेव्हिड मिलर यांनी कोलकात्याच्या गोलंदाजांना नेटाने सामना केला. मात्र आपल्या संघाला विजयपथावर नेण्यात ते अपयशी ठरले.

डोंगराएवढं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पंजाबच्या संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर लोकेश राहुल अवघी 1 धाव काढून माघारी परतला. यानंतर ख्रिस गेलने फटकेबाजी करत झटपट धावा कमावल्या. मात्र रसेलच्या गोलंदाजीवर तोही माघारी परतला. यानंतर सरफराज खानही फारशी चमक दाखवू शकला नाही. मयांक अग्रवाल आणि डेव्हिड मिलर यांनी चौथ्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी रचत चांगली झुंज दिली. मात्र पियुष चावलाने मोक्याच्या क्षणी मयांक अग्रवालचा त्रिफळा उडवत कोलकात्याचं आव्हान कायम राखलं. मयांकने 34 चेंडूत 58 धावांची खेळी केली.

अखेरच्या षटकात मिलर आणि मनदीप सिंह जोडीने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान मिलरनेही आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्याने 59 धावांची खेळी केली. मात्र तोपर्यंत सामना पंजाबच्या हातून निसटला होता. कोलकात्याकडून आंद्रे रसेलने 2, लॉकी फर्ग्युसन आणि पियुष चावला यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला.

त्याआधी, नितीश राणा, रॉबिन उथप्पा आणि मधल्या फळीत आंद्रे रसेलने केलेल्या फटकेबाजीमुळे कालकाता नाईट रायडर्स संघाने, किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात 218 धावांपर्यंत मजल मारली आहे. हा सामना जिंकण्यासाठी पंजाबला 219 धावांची गरज आहे. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा पंजाबचा निर्णय काहीसा अंगलटच आला. कोलकात्याच्या सलामीवीरांना झटपट माघारी धाडण्यात यशस्वी ठरलेले पंजाबचे गोलंदाज रॉबिन उथप्पा आणि नितीश राणा यांची जोडी फोडू शकले नाहीत. दोन्ही फलंदाजांनी तिसऱ्या विकेटसाठी 110 धावांची शतकी भागीदारी केली. नितीश राणाने पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेत आक्रमक अर्धशतक झळकावलं. त्याने 34 चेंडूत 63 धावा पटकावल्या. या खेळीत 2 चौकार आणि 7 षटकार समाविष्ट होते.

वरुण चक्रवर्तीने नितीश राणाचा अडसर दूर केल्यानंतर रॉबिन उथप्पाने खेळाची सुत्र आपल्या हाती घेतली. दुसऱ्या बाजूने आंद्रे रसेलच्या साथीने पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेणं सुरुच ठेवलं. उथप्पानेही यादरम्यान आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्याने 67 धावांची खेळी केली. आंद्रे रसेलनेही अखेरच्या क्षणांमध्ये धडाकेबाज फटकेबाजी करत कोलकात्याला 200 धावांचा टप्पा गाठून दिला. पंजाबकडून मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, हार्डस विल्डोएन आणि अँड्रू टाय यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला. त्यामुळे कोलकात्याने दिलेलं डोंगराएवढं आव्हान पंजाबचा संघ कसं पूर्ण करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Live Blog

23:42 (IST)27 Mar 2019
कोलकाता नाईट रायडर्स सामन्यात विजयी

किंग्ज इलेव्हन पंजाबवर 28 धावांनी केली मात

23:14 (IST)27 Mar 2019
मयांक अग्रवाल त्रिफळाचीत, पंजाबला चौथा धक्का

पियुष चावलाने उडवला अग्रवालचा त्रिफळा

23:03 (IST)27 Mar 2019
मयांक अग्रवालचं अर्धशतक

मयांक - डेव्हिड मिलर जोडीची झुंज सुरुच

22:35 (IST)27 Mar 2019
सरफराज खान माघारी, पंजाबला तिसरा धक्का

रसेलच्या गोलंदाजीवर कर्णधार दिनेश कार्तिकने घेतला झेल

22:19 (IST)27 Mar 2019
ख्रिस गेल माघारी, पंजाबला दुसरा धक्का

आंद्रे रसेलच्या गोलंदाजीवर गेल माघारी

22:04 (IST)27 Mar 2019
पंजाबची अडखळती सुरुवात, लोकेश राहुल माघारी

फर्ग्युसनने घेतला राहुलचा बळी

21:43 (IST)27 Mar 2019
20 षटकात कोलकात्याची 218 धावांपर्यंत मजल

पंजाबला विजयासाठी 219 धावांचं आव्हान

21:39 (IST)27 Mar 2019
अखेरच्या षटकात आंद्रे रसेल माघारी

अँड्रू टायच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात रसेल झेलबाद. रसेलच्या 17 चेंडूत 48 धावा

21:26 (IST)27 Mar 2019
शमीने उडवला रसेलचा त्रिफळा, मात्र नो-बॉलमुळे रसेलला जीवदान

पंजाबच्या खेळा़डूने 30 यार्ड सर्कलमध्ये क्षेत्ररक्षणाचा नियम मो़डल्याने पंचांकडून नो-बॉलची घोषणा

21:15 (IST)27 Mar 2019
रॉबिन उथप्पाचं अर्धशतक

नितीश राणा माघारी परतल्यानंतर उथप्पाने आपलं अर्धशतक पूर्ण करत, पंजाबच्या गोलंदाजांवर आक्रमण सुरुच ठेवलं आहे

21:09 (IST)27 Mar 2019
अखेर नितीश राणा माघारी

वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात नितीश राणा माघारी.

मयांक अग्रवालने घेतला झेल, कोलकात्याचा तिसरा गडी माघारी

21:07 (IST)27 Mar 2019
नितीश राणाचं धडाकेबाज अर्धशतक

नितीश राणाने पंजाबच्या गोलंदाजीचा समाचार घेत अर्धशतकी खेळी केली

21:00 (IST)27 Mar 2019
कोलकात्याचा डाव सावरला

नितीश राणा - रॉबिन उथप्पा जोडीची भागीदारी, कोलकात्याने ओलांडला 100 धावांचा टप्पा

20:20 (IST)27 Mar 2019
सुनील नरीन माघारी, कोलकात्याला दुसरा धक्का

फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात लोकेश राहुलकडे झेल देत नरीन माघारी.

विल्जोएनला पदार्पणाच्या सामन्यातचं पहिली विकेट

20:15 (IST)27 Mar 2019
कोलकात्याला पहिला धक्का, ख्रिल लिन माघारी

मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात लिन मिलरच्या हाती झेल देत माघारी

20:14 (IST)27 Mar 2019
सुनील नरीनची आक्रमक सुरुवात

पंजाबच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करत नरेनची फटकेबाजी

19:39 (IST)27 Mar 2019
कोलकात्याच्या संघात बदल नाही, पंबाजमध्ये महत्वाचे बदल

डेव्हिड मिलर आणि वरुण चक्रवर्ती या खेळाडूंना संघात स्थान

19:38 (IST)27 Mar 2019
पंजाबने नाणेफेक जिंकली

कर्णधार रविचंद्रन आश्विनचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

Story img Loader