IPL 2019 KKR vs MI : ईडन गार्डन्सवर झालेल्या सामन्यात मुंबईला कोलकाताने ३४ धावांनी पराभूत केले. आंद्रे रसलच्या नाबाद ८० धावांच्या खेळीच्या जोरावर कोलकाताने मुंबईपुढे २३३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना हार्दिक पांड्याने प्रयत्नांची शर्थ करत ९१ धावांची खेळी केली. पण त्याची झुंज अपयशी ठरली. मुंबईच्या इतर खेळाडूंची त्याला अपेक्षित साथ मिळू शकली.
IPL 2019 : रसल म्हणतो, ‘बायको माझ्यासाठी लकी चार्म’
२३३ धावांच्या बलाढ्य आव्हानाचा पाठलाग करताना क्विंटन डी कॉक झेलबाद झाला. भोपळाही न फोडता तो माघारी परतला. कर्णधार रोहित शर्मा पायचीत झाला. मैदानावरील पंचांनी त्याला बाद ठरवल्यानंतर त्याने DRS ची मदत घेतली. पण त्यात पंचांचा निर्णय तिसऱ्या पंचांना मान्य असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मुंबईचा रिव्ह्यू वाचला, पण रोहितला मात्र तंबूचा रस्ता धरावा लागला. डावखुरा फलंदाज एवीन लुईस १६ चेंडूत १५ धावा करून माघारी गेला. सूर्यकुमार यादवने मोठे फटके खेळण्यास सुरुवात केली होती, पण १४ चेंडूत २६ धावा करून तो बाद झाला. तुफान फटकेबाजीच्या जोरावर हार्दिक पांड्याने ३४ चेंडूत ९१ धावा केल्या. यात ६ चौकार आणि ९ षटकार यांचा समावेश होता. याच फटकेबाजीच्या प्रयत्नात तो माघारी परतला. त्याचा भाऊ कृणाल पांड्या याच्याकडून मुंबईच्या संघाला अपेक्षा होत्या, पण तो स्वस्तात बाद झाला. पण तो बाद होण्याआधी त्याला एक जीवनदान मिळाल्याची चर्चा चांगलीच रंगली.
१५ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर त्याने षटकार लगावला. त्यानंतर त्याने दुसऱ्या चेंडूवरही षटकार लगावण्याचा प्रयत्न केला. हा चेंडू उंच उडाला. पण हा झेल पकडण्याबाबत दिनेश कार्तिक आणि रॉबिन उथप्पा यांच्यात गोंधळ झाला. या गोंधळात झेल तर सुटलाच. पण त्याबरोबरच एकाच संघाने खेळाडू आपसात भिडल्याचेही दिसून आले.
त्यानंतर काही वेळातच कृणाल बाद झाला आणि मुंबईला सामना गमवावा लागला. त्याआधी सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या कोलकात्याच्या गोलंदाजांनी मुंबईवर पूर्णपणे वर्चस्व मिळवले. गिल, लिन आणि रसेल यांनी मैदानात चौफेर फटकेबाजी करत मुंबईच्या गोलंदाजांच्या अक्षरशः नाकीनऊ आणले. शुभमन गिलने ४५ चेंडूत ७६ धावांची खेळी करत पुन्हा एकदा आपली उपयुक्तता दाखवून दिली. ख्रिस लिन आणि शुभमन गिल जोडीने पहिल्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी केली. अर्धशतक झाल्यावर राहुल चहरने लिनचा अडसर दूर केला.
IPL 2019 : हार्दिक पांड्याचा तडाखा; रचला ‘हा’ इतिहास
त्यानंतर मैदानावर आलेल्या आंद्रे रसलने गिलच्या साथीने फटकेबाजी केली आणि संघाची बाजू भक्कम केली. दोन्ही फलंदाजांनी पुन्हा एकदा मुंबईच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर गिल माघारी परतल्यानंतर कार्तिकच्या साथीने रसेलने आपलं अर्धशतक साजरं केलं. रसलने ४० चेंडूत नाबाद ८० धावा ठोकल्या. मुंबईकडून हार्दिक पांड्या आणि राहुल चहरने १-१ बळी घेतला.