IPL 2019 KKR vs MI : कोलकाताच्या मैदानावरील मुंबईविरुद्धच्या सामन्यात आंद्रे रसल (८०*), शुभमन गिल (७६) आणि ख्रिस लिन (५४) यांनी केलेल्या आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर कोलकात्याने २ बाद २३२ धावांचा डोंगर उभा केला आणि मुंबईला २३३ धावांचे आव्हान दिले. या सामन्यात रसलने तुफान फटकेबाजी केली. त्याने ४० चेंडूत नाबाद ८० धावा ठोकल्या. यात तब्बल ८ षटकार लगावले. या षटकारांच्या आतषबाजीमुळेच रसलने यंदाच्या हंगामात षटकारांचे अर्धशतक पूर्ण केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सामना सुरु होण्याआधी त्याच्या नावावर ४२ षटकार होते. शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूंवर त्याने मलिंगाला दणदणीत षटकार खेचत ५० वा षटकार खेचला. या यादीत रसल इतरांपेक्षा खूप पुढे आहे. यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ख्रिस गेलच्या नावावर ३२ षटकार आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या षटकारांमध्ये १८ चा फरक आहे.

दरम्यान, सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या कोलकात्याच्या गोलंदाजांनी मुंबईवर पूर्णपणे वर्चस्व मिळवले. गिल, लिन आणि रसेल यांनी मैदानात चौफेर फटकेबाजी करत मुंबईच्या गोलंदाजांच्या अक्षरशः नाकीनऊ आणले. शुभमन गिलने ४५ चेंडूत ७६ धावांची खेळी करत पुन्हा एकदा आपली उपयुक्तता दाखवून दिली. ख्रिस लिन आणि शुभमन गिल जोडीने पहिल्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी केली. अर्धशतक झाल्यावर राहुल चहरने लिनचा अडसर दूर केला.

त्यानंतर मैदानावर आलेल्या आंद्रे रसलने गिलच्या साथीने फटकेबाजी केली आणि संघाची बाजू भक्कम केली. दोन्ही फलंदाजांनी पुन्हा एकदा मुंबईच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर गिल माघारी परतल्यानंतर कार्तिकच्या साथीने रसेलने आपलं अर्धशतक साजरं केलं. रसलने ४० चेंडूत नाबाद ८० धावा ठोकल्या. मुंबईकडून हार्दिक पांड्या आणि राहुल चहरने १-१ बळी घेतला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2019 kkr vs mi kkr batsman andre russell completes 50 sixes this season