कर्णधार विराट कोहलीचं आक्रमक शतक आणि मोईन अलीने केलेल्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने २१३ धावांपर्यंत मजल मारली आहे. कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर बंगळुरुच्या फलंदाजांनी आज आश्वासक फलंदाजी केली. मोईन अलीने ६६ तर कर्णधार विराट कोहलीने ५८ चेंडूत १०० धावांची खेळी केली. या दोन्ही फलंदाजांनी कोलकात्याच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत विराट आणि मोईन अली जोडीने कोलकात्याच्या गोलंदाजांच्या नाकीनऊ आणले.

विराट-मोईन जोडीने कोलकात्याचा चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवला लक्ष्य केलं. कुलदीपच्या ४ षटकात बंगळुरुच्या फलंदाजांनी ५९ धावा कुटल्या. या कामगिरीमुळे कुलदीप यादव आयपीएलमध्ये सर्वात महागडा गोलंदाज ठरला आहे. कुलदीपने इम्रान ताहीरच्या विक्रमाशी बरोबरी केली. इम्रान ताहीरने २०१६ साली मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्यात ५९ धावा दिल्या होत्या.

दरम्यान, नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा दिनेश कार्तिकचा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. सलामीवीर पार्थिव पटेल आणि अक्षदीप नाथ झटपट माघारी परतले. मात्र यानंतर विराट कोहली आणि मोईन अली यांनी तिसऱ्या विकेटसाठी धडाकेबाज अर्धशतकी भागीदारी रचली. दोन्ही फलंदाजांनी कोलकात्याच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. या भागीदारीमुळेच बंगळुरुने आजच्या सामन्यात आश्वासक धावसंख्येचा पल्ला गाठला. कोलकात्याकडून सुनील नरीन, आंद्रे रसेल, हॅरी गुर्ने आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

Story img Loader