शुभमन गिलचं धडाकेबाज अर्धशतक आणि त्याला ख्रिस लिन, रॉबिन उथप्पा आणि आंद्रे रसेलने दिलेल्या भक्कम साथीच्या जोरावर कोलकात्याने पंजाबवर ७ गडी राखून मात केली आहे. या पराभवासह पंजाबचं आयपीएलच्या बाराव्या हंगामातलं आव्हान संपुष्टात आलेलं आहे. बाद फेरीतल्या अखेरच्या स्थानासाठी कोलकात्याच्या आशा अजुनही बाकी आहेत. मात्र यासाठी त्यांना मुंबई इंडियन्सविरुद्धचा अखेरचा सामना जिंकत इतर संघाच्या निकालांवर अवलंबून रहावं लागणार आहे.

१८४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शुभमन गिल आणि ख्रिस लिन जोडीने संघाला आश्वासक सुरुवात करुन दिली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी करुन दिली. अँड्रू टायने स्वतःच्या गोलंदाजीवर लिनचा झेल पकडत कोलकात्याला पहिला धक्का दिला. लिनने ४६ धावा केल्या, त्याचं अर्धशतक ४ धावांनी हुकलं. लिन माघारी परतल्यानंतरही गिलने एक बाजू भक्कमपणे लावून धरत संघाचं आव्हान कायम राखलं. यादरम्यान गिलने आपलं अर्धशतकही साजरं केलं. त्याने नाबाद ६५ धावांची खेळी केली.

यानंतर रॉबिन उथप्पा, आंद्रे रसेल यांनी पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेत आपल्या संघाला विजयाच्या जवळ आणून सोडलं. या दोन्ही फलंदाजांना माघारी धाडण्यात पंजाबला यश आलं खरं, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. विजयासाठी आवश्यक असलेल्या धावा गिल-कार्तिक जोडीने पूर्ण करत पंजाबच्या स्वप्नांवर पाणी फिरवलं. पंजाबकडून मोहम्मद शमी, रविचंद्रन आश्विन आणि अँड्रू टाय यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

त्याआधी, मधल्या फळीतल्या फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर पंजाबने घरच्या मैदानावर १८३ धावांपर्यंत मजल मारली. कोलकात्याच्या गोलंदाजांनी सामन्याच्या पहिल्या षटकापासून भेदक मारा करत पंजाबच्या धावगतीवर अंकुश ठेवला. मात्र अखेरच्या षटकात मनदीप सिंह, सॅम करन, निकोलस पूरन यांनी फटकेबाजी करत संघाला आश्वासक धावसंख्या गाठून दिली.

नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा दिनेश कार्तिकचा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. सलामीवीर लोकेश राहुल आणि ख्रिस गेल यांना तात्काळ माघारी धाडण्यात कोलकात्याला यश आलं. यानंतर निकोलस पूरन आणि मयांक अग्रवाल यांनी तिसऱ्या विकेटसाठी छोटेखानी भागीदारी केली. या भागीदारीमुळे पंजाबचा डाव सावरला, मात्र नितीश राणाने पूरनचा अडथळा दूर करुन पंजाबला तिसरा धक्का दिला.

यानंतर अखेरच्या फळीतल्या फलंदाजांनी फटकेबाजी करत कोलकात्याला चांगली झुंज दिली. सॅम करनने अर्धशतकी खेळी करत नाबाद ५५ धावा केल्या. कोलकात्याकडून संदीप वॉरियरने २ तर हॅरी गुर्ने, आंद्रे रसेल आणि नितीश राणा यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला. पंजाबचा एक फलंदाज धावबाद झाला.

Live Blog

23:31 (IST)03 May 2019
शुभमन गिल-दिनेश कार्तिक जोडीकडून पंजाबच्या विजयावर शिक्कामोर्तब

पंजाबचं आव्हान संपुष्टात, कोलकात्याच्या बाद फेरीत प्रवेशासाठीच्या आशा कायम

23:08 (IST)03 May 2019
आंद्रे रसेल माघारी, कोलकात्याला तिसरा धक्का

मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर अँड्रू टायने घेतला झेल

याआधीच टायच्या गोलंदाजीवर पंजाबने रसेलला जिवदान दिलं होतं

23:01 (IST)03 May 2019
शुभमन गिलचं अर्धशतक

कोलकात्याची विजयाच्या दिशेने वाटचाल

22:46 (IST)03 May 2019
कोलकात्याला दुसरा धक्का, रॉबिन उथप्पा माघारी

कर्णधार रविचंद्रन आश्विनने घेतला बळी

मात्र तोपर्यंत कोलकात्याने १०० धावांचा टप्पा गाठला होता

22:31 (IST)03 May 2019
कोलकात्याला पहिला धक्का, ख्रिस लिन माघारी

अँड्रू टायने स्वतःच्या गोलंदाजीवर केलं झेलबाद

त्याआधी पहिल्या विकेटसाठी लिन-गिल जोडीची ६२ धावांची भागीदारी

21:45 (IST)03 May 2019
पंजाबची १८३ धावांपर्यंत मजल

कोलकात्याला विजयासाठी १८४ धावांचं आव्हान

सॅम करनचं झुंजार नाबाद अर्धशतक

21:42 (IST)03 May 2019
सॅम करनची अखेरच्या षटकांत फटकेबाजी

झळकावलं आयपीएलमधलं पहिलं अर्धशतक

21:33 (IST)03 May 2019
पंजाबला सहावा धक्का, रविचंद्रन आश्विन माघारी

आंद्रे रसेलने उडवला त्रिफळा

21:31 (IST)03 May 2019
मनदीप सिंह माघारी, पंजाबला पाचवा धक्का

गुर्नेच्या गोलंदाजीवर रॉबिन उथप्पाने घेतला झेल

21:11 (IST)03 May 2019
मयांक अग्रवाल धावबाद, पंजाबचा चौथा गडी माघारी

पंजाबच्या धावगतीवर कोलकात्याच्या गोलंदाजांचा अंकुश

20:57 (IST)03 May 2019
निकोलस पूरन माघारी, पंजाबला तिसरा धक्का

नितीश राणाने पंजाबची जमलेली जोडी फोडली

20:27 (IST)03 May 2019
पंजाबला मोठा धक्का, ख्रिस गेलही माघारी

संदीप वॉरियरने घेतला दुसरा बळी

20:14 (IST)03 May 2019
पंजाबला पहिला धक्का, लोकेश राहुल माघारी

संदीप वॉरियरच्या गोलंदाजीवर ख्रिस लिनने घेतला झेल

19:36 (IST)03 May 2019
कोलकात्याने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

दोन्ही संघांना आजच्या सामन्यात विजय महत्वाचा

Story img Loader