आयपीएलच्या अकराव्या हंगामाचं विजेतेपद पटकावणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्जला यंदाच्या हंगामात पहिल्या सामन्याआधी धक्का बसला आहे. चेन्नईच्या प्रमुख गोलंदाजांपैकी एक, लुंगिसानी एन्गिडी हा यंदाच्या हंगामातून बाहेर गेला आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका वन-डे सामन्यात एन्गिडीला दुखापत झाली आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात चेन्नईच्या संघासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
एन्गिडीने गेल्या हंगामात अनेक सामन्यांमध्ये चेन्नईच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली होती. यंदाच्या हंगामासाठी मार्क वूडऐवजी एन्गिडीला चेन्नईने संघात कायम राखलं होतं. श्रीलंकेविरुद्ध वन-डे मालिकेत दुखापत झाल्यानंतर एन्गिडीला टी-२० मालिकेत विश्रांती देण्यात आली होती. मात्र वैद्यकीय तपासणीनंतर एन्गिडी पुढील काही महिने खेळू शकणार नसल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं. चेन्नईने एन्गिडीला पर्यायी गोलंदाजांची घोषणा केलेली नाही.