जेसन बेहरनडॉर्फ, लसिथ मलिंगा आणि हार्दिक पांड्याने केलेल्या माऱ्याच्या जोरावर मुंबईने घरच्या मैदानावर विजयाची नोंद केली आहे. चेन्नई सुपरकिंग्जवर 37 धावांनी मात करत मुंबईने बाराव्या हंगामातली चेन्नईची विजयाची मालिका खंडीत केली आहे. मुंबईने दिलेल्या 171 धावांचा पाठलाग करताना चेन्नईचा संघ 8 गड्यांच्या मोबदल्यात 133 धावांपर्यंत मजल मारु शकला. चेन्नईकडून मराठमोळ्या केदार जाधवने 58 धावांची अर्धशतकी खेळी केली, मात्र त्याला इतर खेळाडूंची हवीतशी साथ मिळाली नाही. मुंबईचा आयपीएलमधला हा शंभरावा विजय ठरला आहे. आतापर्यंत एकाही आयपीएल संघाला 100 विजयांचा टप्पा गाठता आलेला नाहीये.

मुंबईने संघात संधी दिलेल्या जेसन बेहरनडॉर्फने पहिल्याच षटकात चेन्नईला धक्का दिला. अंबाती रायुडूला माघारी धाडत बेहरनडॉर्फने पहिला बळी घेतला. यानंतर शेन वॉटसन आणि सुरेश रैनाही ठराविक अंतराने माघारी परतले. केदार जाधव आणि महेंद्रसिंह धोनीने अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र धोनी माघारी परतल्यानंतर चेन्नईच्या डावाला पुन्हा गळती लागली. अखेरीस 58 धावांवर जाधवही माघारी परतला. यानंतर अखेरच्या फळीतल्या फलंदाजांना मुंबईच्या गोलंदाजांनी फारसे हात मोकळे करण्याची संधी दिली नाही.

मुंबईकडून गोलंदाजांसोबत क्षेत्ररक्षकांनीही चांगली कामगिरी बजावली. पोलार्ड आणि यष्टीरक्षक क्विंटन डी-कॉक यांनी सामन्यात काही चांगले झेल पकडले. मुंबईकडून लसिथ मलिंगा आणि हार्दिक पांड्याने 3-3 बळी घेतले. त्यांना बेहरनडॉर्फने 2 बळी घेत चांगली साथ दिली.

त्याआधी, सूर्यकुमार यादवचं अर्धशतक आणि त्याला कृणाल पांड्याने दिलेली साथ या जोरावर, घरच्या मैदानावर खेळत असताना मुंबई इंडियन्सने 170 धावांपर्यंत मजल मारली. सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर क्विंटन डी-कॉक, कर्णधार रोहित शर्मा आणि युवराज सिंह हे ठराविक अंतराने माघारी परतले.

यानंतर सूर्यकुमार यादव आणि कृणाल पांड्या जोडीने मुंबईचा डाव सावरला. या दोन्ही फलंदाजांनी चौथ्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे मुंबईच्या संघाने आश्वासक धावसंख्याही गाठली. कृणाल पांड्याला बाद करत मोहीत शर्माने मुंबईची जोडी फोडली. मात्र दुसऱ्या बाजूने सूर्यकुमारने आपला खेळ सुरु ठेवत अर्धशतक झळकावलं. त्याने 43 चेंडूत 59 धावांची खेळी केली. त्याच्या खेळीत 8 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.

सूर्यकुमार अखेरच्या षटकांमध्ये मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात ब्राव्होच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर हार्दिक पांड्या आणि कायरन पोलार्ड यांनी अखेरच्या दोन षटकांमध्ये फटकेबाजी करत संघाला 170 धावांचा टप्पा गाठून दिला. चेन्नईकडून शार्दुल ठाकूरचा अपवाद वगळता सर्व गोलंदाजांनी 1-1 बळी घेतला.

Live Blog

23:51 (IST)03 Apr 2019
चेन्नईला आठवा धक्का, दिपक चहर माघारी

हार्दिक पांड्याने घेतला बळी

23:45 (IST)03 Apr 2019
त्याच षटकात ब्राव्होही माघारी, चेन्नईला सातवा धक्का

लसिथ मलिंगाने घेतला बळी

23:42 (IST)03 Apr 2019
केदार जाधव माघारी, चेन्नईला सहावा धक्का

लसिथ मलिंगाने घेतला बळी

23:31 (IST)03 Apr 2019
केदार जाधवचं अर्धशतक

चेन्नई सुपरकिंग्जची झुंज सुरुच

23:26 (IST)03 Apr 2019
त्याच षटकात रविंद्र जाडेजा माघारी, चेन्नईला पाचवा धक्का

हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर क्विंटन डी-कॉकने घेतला झेल

23:23 (IST)03 Apr 2019
धोनी माघारी, चेन्नईला चौथा धक्का

हार्दिक पांड्याने चेन्नईची जमलेली जोडी फोडली

23:23 (IST)03 Apr 2019
केदार जाधव - महेंद्रसिंह धोनी जोडीची अर्धशतकी भागीदारी

चेन्नईचा डाव सावरला

22:36 (IST)03 Apr 2019
सुरेश रैना माघारी, ब्राव्होने सीमारेषेवर घेतला झेल

बेहरनडॉर्फच्या खात्यात आणखी एक बळी

22:15 (IST)03 Apr 2019
दुसऱ्याच षटकात शेन वॉटसन बाद

लसिथ मलिंगाने घेतला बळी, चेन्नईला दुसरा धक्का

22:09 (IST)03 Apr 2019
चेन्नईची अडखळती सुरुवात, अंबाती रायुडू माघारी

जेसन बेहरनडॉर्फच्या गोलंदाजीवर क्विंटन डी-कॉकने घेतला झेल

21:52 (IST)03 Apr 2019
हार्दिक पांड्या - कायरन पोलार्ड जोडीची फटकेबाजी

मुंबईची 170 धावांपर्यंत मजल, चेन्नईला विजयासाठी 171 धावांचं आव्हान

21:37 (IST)03 Apr 2019
मुंबईला पाचवा धक्का, सूर्यकुमार यादव माघारी

ब्राव्होने घेतला बळी

21:32 (IST)03 Apr 2019
सूर्यकुमार यादवचं अर्धशतक, मुंबईची झुंज सुरुच

सूर्यकुमार यादवने एका बाजूने चेन्नईच्या गोलंदाजीचा सामना करत अर्धशतक झळकावलं आहे.

21:31 (IST)03 Apr 2019
अखेर मुंबईची जमलेली जोडी फुटली, कृणाल पांड्या माघारी

मोहित शर्माने घेतला बळी

21:23 (IST)03 Apr 2019
सूर्यकुमार यादव - कृणाल पांड्या जोडीमध्ये अर्धशतकी भागीदारी

मुंबईने गाठला आश्वासक धावसंख्येचा टप्पा

20:44 (IST)03 Apr 2019
ठराविक अंतराने युवराज माघारी, मुंबईला तिसरा धक्का

इम्रान ताहिरच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात युवराज झेलबाद

20:38 (IST)03 Apr 2019
मुंबईला दुसरा धक्का, रोहित शर्मा माघारी

रविंद्र जाडेजाने घेतला बळी

20:13 (IST)03 Apr 2019
मुंबईला पहिला धक्का, क्विंटन डी-कॉक माघारी परतला

दिपक चहरच्या गोलंदाजीवर डी-कॉक झेलबाद

19:42 (IST)03 Apr 2019
मुंबईच्या संघात दोन बदल

मिचेल मॅक्लेनघनच्या जागी जेसन बेहरनडॉर्फ तर मयांक मार्कंडच्या जागी राहुल चहरला संधी

19:41 (IST)03 Apr 2019
चेन्नईने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजीचा निर्णय
Story img Loader