IPL 2019 मध्ये आज (शुक्रवारी) क्वालिफायर २ सामन्यात दिल्ली आणि चेन्नई या दोन संघामध्ये सामना रंगणार आहे. या सामन्यातील विजेता संघ मुंबईच्या संघाविरुद्ध १२ मे रोजी अंतिम सामना खेळणार आहे. मंगळवारी झालेल्या क्वालिफायर १ मध्ये विजय मिळवून मुंबईच्या संघाने अंतिम सामना गाठला. चेन्नईच्या संघाविरुद्ध झालेल्या क्वालिफायर १ सामन्यात मुंबईने चेन्नईला ६ गडी राखून सहज पराभूत केले. १३२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या सूर्यकुमार यादवने नाबाद अर्धशतकी खेळी केली. या विजयासह मुंबईने पाचव्यांदा स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. त्यामुळे ज्या संघाला अंतिम फेरी गाठायची असेल, त्या संघाने आजचा सामना जिंकणे अनिवार्य आहे.

या सामन्यात मुख्य लक्ष असेल ते महेंद्रसिंग धोनी आणि ऋषभ पंत या दोघांच्या कामगिरीवर… ऋषभ पंत याने बाद फेरीच्या सामन्यात फटकेबाजी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. त्यामुळे आजच्या सामन्यात गुरु धोनीच्या रणनीतीविरुद्ध ऋषभ कसा कळेल करतो यावर साऱ्यांचे लक्ष आहे. पण याबरोबरच धोनीच्या एका विक्रमाकडेही साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

महेंद्रसिंग धोनी सध्या IPL इतिहासातील एका मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर आहे. यष्टिरक्षण करताना घेतलेल्या बळींच्या यादीत धोनी IPL मध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. धोनीने IPL मध्ये क्सएल आणि यष्टिचीत असे दोन प्रकारच्या माध्यमातून संघाला १२९ गडी बाद करून दिले आहेत. यात ९१ झेल आणि ३८ यष्टिचीत आहेत. पण कोलकाताचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिक हा या यादीत अव्वल आहे. दिनेश कार्तिकच्या नावावर १३१ बळी आहेत. जर धोनीला हा विक्रम मोडून नवा विक्रम प्रस्थापित करायचा असेल, तर त्याला आजच्या सामन्यात किमान ३ गडी बाद करून द्यावे लागणार आहेत.

दरम्यान, दिनेश कार्तिकचा संघ IPL च्या चालू हंगामातून आधीच बाहेर पडला आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामातच धोनीला त्याचा विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी आहे. जर आजच्या सामन्यात धोनीला हा विक्रम मोडता आला नाही, पण चेन्नईचा संघ आजचा सामना जिंकला तर अंतिम सामन्यातही त्याला हा विक्रम मोडण्याची संधी मिळणार आहे.