IPL २०१९ च्या हंगामासाठी डिसेंबर महिन्यात खेळाडूंचा लिलाव होणार आहे. यासाठी सर्व संघमालक आणि सहाय्यक स्टाफ हे जगभरात सुरु असलेल्या प्रत्येक सामन्यावर नजर ठेवून आहेत. यंदाच्या हंगामासाठी कोणत्या खेळाडूवर ‘दाव’ लावायचा? किंवा कोणत्या खेळाडूला संघातून सोडचिठ्ठी द्यायची? याबाबत सध्या संघांमध्ये खलबतं सुरु आहेत. पण याच चर्चांमध्ये मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे IPL मधील दोन संघ मात्र आपल्याकडे असलेल्या खेळाडूंच्या बळावर एकमेकांशी ट्विटरवॉर करण्यात दंग असल्याचे दिसून आले.

मुंबई इंडियन्सचा खेळाडू हार्दिक पांड्या याने एक फोटो सर्वप्रथम ट्विट केला होता. त्यात हार्दिक, फिरकीपटू कृणाल पांड्या आणि विंडीजचा धडाकेबाज खेळाडू कायरन पोलार्ड हे होते. हा फोटो कोट करत मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून ट्विट केला. या फोटोवर ‘आपल्या संघासाठी चांगले अष्टपैलू त्रिकुट शोधा. आम्ही वाट पाहू’, असे कॅप्शन टाकले.

यावर हैदराबादच्या संघाने मोहम्मद नबी, रशीद खान आणि शाकिब अल हसन या तिघांचा फोटो ट्विट करत ‘प्रतीक्षा संपली’ असे ट्विट केले.

हे वॉर इथे थांबले नाही. तर त्यापुढे मुंबई इंडियन्सने IPL मध्ये जिंकलेल्या चषकांचा एक फोटो ट्विट केला. त्यांच्याकडे या स्पर्धेची तीन विजेतेपदं आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून तसे ट्विट केले होते आणि ‘प्रतीक्षा अजून संपलेली नाही’, असे कॅप्शन दिले.

दरम्यान, या ट्विटरवॉरची नेटकऱ्यांनीही मजा घेतली आणि आपली मजेशीर मतंही नोंदवली.

Story img Loader