मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने अटीतटीच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबवर ३ गडी राखून मात केली. पंजाबने विजयासाठी दिलेल्या १९८ धावांचं आव्हान पार करताना मुंबईची फलंदाजी पुरती कोलमडली होती. मात्र रोहित शर्माच्या अनुपस्थितीत संघाचं नेतृत्व करणाऱ्या कायरन पोलार्डने ८३ धावांची दमदार खेळी करत मुंबईला अशक्यप्राय विजय मिळवून दिला. पंजाबचा कर्णधार रविचंद्रन आश्विननेही पोलार्डच्या खेळीचं कौतुक केलं.

“पोलार्डने अखेरच्या षटकांमध्ये सुरेख खेळ केला, आणि आमच्या हातातला सामना हिरावून नेला. मात्र सामन्यात पराभव झाला असला तरीही अनेक सकारात्मक गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या. आम्ही फलंदाजीमध्ये चांगली सुधारणा केली आहे, राहुल आणि ख्रिस गेल फॉर्मात परत आले आहेत. क्षेत्ररक्षणात आम्ही जरा अधिक चांगली कामगिरी केली असती, तर कदाचीत सामन्याचा निकाल वेगळा लागला असता.” आश्विन पत्रकारांशी बोलत होता.

अवश्य वाचा – पोलार्डच्या वादळी खेळीत पंजाबची धुळधाण, मुंबई 3 गडी राखून विजयी

दरम्यान पंजाबने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना, रोहित शर्माच्या अनुपस्थितीत संघात स्थान मिळालेल्या सिद्धेश लाडने डावाची आक्रमक सुरुवात केली. मात्र या आक्रमक सुरुवातीचं मोठ्या खेळीत रुपांतर करणं त्याला जमलं नाही. यानंतर मधल्या फळीत सूर्यकुमार यादवने काहीकाळ पोलार्डची चांगली साथ दिली. यानंतर मुंबईचा डाव परत कोलमडला. मात्र यानंतर अल्झारी जोसेफच्या साथीने पोलार्डने मुंबईला परत विजयाच्या समीप आणून ठेवलं. मुंबई सामना जिंकणार असं वाटत असताना पोलार्ड अखेरच्या षटकात बाद झाला. अखेरीस अल्झारी जोसेफ आणि चहर यांनी मुंबईला विजय मिळवून दिला.

Story img Loader