IPL 2019 RR vs SRH : IPL च्या या हंगामातील घरच्या मैदानावर शेवटचा सामना खेळणाऱ्या राजस्थानने शेवट गोड करत हैदराबादवर ७ गडी राखून विजय मिळवला. मनीष पांडेच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर हैदराबादने राजस्थानला १६१ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान राजस्थानने ५ चेंडू राखून सहज पूर्ण केले.
राजस्थानचा विजय हा चेन्नईच्या पथ्यावर पडला. मुंबईविरुद्ध चेन्नईच्या संघाला पराभव पत्करावा लागला होता. तो सामना चेन्नईने जिंकला असता, तर ‘प्ले-ऑफ्स’मध्ये त्यांना थेट प्रवेश मिळाला असता. पण त्यांचा प्रवेश लांबणीवर पडला. पण राजस्थानच्या संघाने मिळवलेल्या विजयामुळे अखेर चेन्नई पुढील फेरीसाठी पात्र ठरली.
संघ | सामने | विजय | पराभव | नेट रनरेट | गूण |
---|---|---|---|---|---|
(Q) चेन्नई सुपरकिंग्ज | १२ | ८ | ४ | -०.११३ | १६ |
मुंबई इंडियन्स | ११ | ७ | ४ | +०.५३७ | १४ |
दिल्ली कॅपिटल्स | ११ | ७ | ४ | +०.१८१ | १४ |
सनराईजर्स हैदराबाद | ११ | ५ | ६ | +०.५५९ | १० |
किंग्ज इलेव्हन पंजाब | ११ | ५ | ६ | -०.११७ | १० |
राजस्थान रॉयल्स | १२ | ५ | ७ | -०.३२१ | १० |
कोलकाता नाईट रायडर्स | ११ | ४ | ७ | -०.०५० | ८ |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | ११ | ४ | ७ | -०.६८३ | ८ |
दरम्यान, शनिवारी झालेल्या सामन्यात १६१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अजिंक्य रहाणे आणि नवोदित लिआम लिव्हिंगस्टोन या सलामीवीरांनी राजस्थानला दमदार सुरूवात करून दिली आणि सहाव्या षटकात अर्धशतकी सलामी दिली. लिव्हिंगस्टोन चांगली फलंदाजी करत असताना रशीद खानने त्याचा अडसर दूर केला आणि राजस्थानला पहिला धक्का दिला. लिव्हिंगस्टोन याने २६ चेंडूत ४४ धावा ठोकल्या. चांगली सुरुवात मिळाल्यानंतर अजिंक्य रहाणे झेलबाद झाला. रहाणेने ३९ धावांची उपयुक्त खेळी केली. राजस्थानचा कर्णधार मोठा फटका खेळताना बाद झाला. त्याने २२ धावा केल्या.
त्याआधी, राजस्थानच्या गोलंदाजांनी मधल्या फळीत केलेल्या दमदार पुनरागमनाच्या जोरावर राजस्थानने घरच्या मैदानावर हैदराबादला १६० धावांवर रोखण्यात यश मिळवलं. हैदराबादचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि केन विल्यमसन यांनी संघाला आश्वासक सुरुवात करुन दिली. जॉनी बेअरस्टो हा हैदराबादचा विश्वासू सलामीवीर विश्वचषकाच्या तयारीसाठी मायदेशी परतला. त्यामुळे विल्यमसनला सलामीला यावे लागले. डेव्हिड वॉर्नर – केन विल्यमसन यांनी पहिल्या विकेटसाठी २८ धावांची छोटेखानी भागीदारी केली. मात्र विल्यमसन मैदानावर फार काळ तग धरु शकला नाही.
विल्यमसन बाद झाल्यानंतर मनिष पांडे आणि डेव्हिड वॉर्नर यांनी आश्वासक भागीदारी करुन संघाचा डाव सावरला. या दोघांनी संघाला शतक गाठून दिले. संघाची धावसंख्या १ बाद १०३ असताना वॉर्नरचा स्टीव्ह स्मिथने अप्रतिम झेल टिपला. त्यानंतर हैदराबादला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. डेव्हिड वॉर्नर माघारी परतल्यानंतर हैदराबादचे फलंदाज राजस्थानच्या गोलंदाजीचा सामना करु शकले नाहीत. हैदराबादने झटपट ७ बळी गमावले. मनीष पांडे, विजय शंकर, शाकीब अल हसन, दिपक हुडा, वृद्धीमान साहा आणि भुवनेश्वर कुमार हे सात गडी एका पाठोपाठ एक असे तंबूत परतले. विल्यमसन, मनीष पांडे, वॉर्नर आणि रशीद खान वगळता कोणालाही दुहेरी धावसंख्या उभारता आली नाही.
अखेर तळातल्या फळीतल्या फलंदाजांनी हैदराबादला १६० धावांचं लक्ष्य गाठून दिलं. राजस्थानकडून थॉमस, वरुण अरॉन, श्रेयस गोपाळ आणि जयदेव उनाडकट यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले.