आयपीएलच्या बाराव्या हंगामाला शनिवारपासून सुरुवात होते आहे. पहिल्या सामन्यात गतविजेता चेन्नई सुपरकिंग्ज संघ विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाशी खेळणार आहे. चेन्नईच्या मैदानावर हा सामना रंगणार असल्यामुळे या सामन्याला चाहते मोठ्या प्रमाणात गर्दी करतील अशी आशा सर्वांना आहे. दरम्यान या सामन्यासाठी विराट कोहली आणि धोनी यांनीही कसून सराव करायला सुरुवात केली आहे. या दोन्ही संघाच्या सरावसत्राचे फोटो नुकतेच सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आलं आहे.
दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा भोगून आल्यानंतर चेन्नईने गेल्या हंगामात सनराईजर्स हैदराबादवर मात केली होती. त्यामुळे यंदाच्या हंगामातही धोनीच्या चेन्नई संघाला विजयाचं प्रबळ दावेदार मानलं जात आहे. मात्र विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा गेल्या काही हंगामातला इतिहास फारसा चांगला नाही. त्यामुळे यंदाच्या हंगामात नवीन खेळाडूंसह धडाक्यात सुरुवात करण्याचा विराट कोहलीचा प्रयत्न असणार आहे.