IPL 2019 RCB vs RR : बंगळुरूच्या मैदानावर खेळण्यात आलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. मुसळधार पावसामुळे सामना ५-५ षटकांचा खेळवण्यात येणार होता. त्यानुसार बंगळुरूने प्रथम फलंदाजी करत राजस्थानला ६३ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला १० चेंडूत २२ धावांची आवश्यकता असताना पावसाने पुन्हा हजेरी लावली आणि अखेर सामना रद्द करण्यात आला. या पराभवाबरोबरच बंगळुरूच्या ‘प्ले-ऑफ्स’ फेरीत पोहोचण्याच्या आशा पूर्णपणे मावळल्या. तसेच राजस्थानचादेखील ‘प्ले-ऑफ्स’ फेरीत पोहोचण्याचा मार्ग आणखी खडतर झाला.

IPL 2019 RCB vs RR : पावसाने काढली बंगळुरूची ‘विकेट’; सामना अनिर्णित

आजचा सामना हा तळाच्या दोन संघांमध्ये होता. सामन्यात राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने नाणेफेक जिकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पावसामुळे सामना सुरु होण्यास खूप उशीर झाला. पण सामना सुरु होताच विराट आणि डीव्हिलियर्सने यांनी दणकेबाज सुरुवात केली. पण पुढच्याच षटकात श्रेयस गोपाळने हॅटट्रिक घेत राजस्थानला सामन्यात पुनरागमन करून दिले. त्यामुळे बंगळुरूच्या संघ ५ षटकात ७ बाद ६२ धावा करू शकला.

श्रेयस गोपाळ

 

या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या सलामीवीरांची २० चेंडूत ४१ धावांची भागीदारी केली. पण संजू सॅमसन (२८) झेलबाद झाला आणि नंतर पावसाने पुन्हा हजेरी लावली. त्यामुळे अखेर खेळ रद्द करण्यात आला.

सामना अनिर्णित राहिल्याचा सर्वात मोठा फटका बंगळुरूला बसला. या सामन्याआधी राजस्थानचा संघ १२ सामन्यांपैकी ५ विजय मिळवून १० गुणांसह सातव्या क्रमांकावर होता, तर बंगळुरूचा संघ १२ पैकी ४ विजय मिळवून ८ गुणांवर होता. पण पावसामुळे सामना रद्द करण्यात आला. त्यामुळे दोनही संघाना १-१ गुण देण्यात आला.

आजच्या सामन्यात देण्यात आलेल्या गुणांमुळे बंगळुरूचा संघ ९ गुणांवर पोहोचला. आता उर्वरित १ सामना जिंकूनही बंगळुरूला जास्तीत जास्त ११ गुण कमावता येतील. पण सध्याच्या गुणतालिकेनुसार मुंबई आणि हैदराबाद यांच्या खात्यात ११ पेक्षा जास्त म्हणजेच अनुक्रमे १४ आणि १२ गुण आहेत. त्यामुळे बंगळुरूच्या IPL 2019 स्पर्धेला पूर्णविराम लागला.

दुसरीकडे राजस्थानच्या संघाला १ गुण मिळाला असून त्यांचे एकूण गुण ११ झाले आणि राजस्थान पाचव्या स्थानी पोहोचले. उर्वरित एका सामन्यात विजय मिळवल्यास त्यांचे १३ गुण होतील. पण हैदराबादचे सध्या १२ गुण आहेत आणि त्यांचा नेट रनरेटदेखील +०.७०९ म्हणजेच आठही संघांमध्ये सर्वाधिक आहे. त्यामुळे हैदराबादने दोनही सामने गमावले तरच राजस्थानला ‘प्ले-ऑफ्स’मध्ये पोहोचण्याची संधी आहे.