आयपीएलच्या बाराव्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंत चांगल्याच फॉर्मात आहे. आपल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर ऋषभने दिल्लीला अंतिम फेरीच्या जवळ आणून ठेवलं आहे. विश्वचषक संघात ऋषभ पंतला संधी मिळाली नाही, मात्र यामुळे खचून न जाता पंतने आयपीएलमध्ये मिळत असलेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेत सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडली आहे. हैदराबादविरुद्ध सामन्यातही ऋषभने फटकेबाजी करत संघाला विजयाच्या जवळ आणून सोडलं होतं.
भारताचा माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकरही त्याच्या या खेळीने प्रभावित झाला आहे. आपल्या ट्विटर हँडलवर संजय मांजरेकरने ऋषभ पंतचा उल्लेख, नवीन पिढीचा विरेंद्र सेहवाग असा केला आहे.
Penny dropped for me last night. Rishabh is this generation’s Viru. Batsman who needs to be treated differently…which is to just let him be. You either pick him or drop him but never try & change him.#RishabhPant
— Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) May 9, 2019
डावखुऱ्या ऋषभ पंतने यंदाच्या हंगामात गोलंदाजांचा समाचार घेत, १५ सामन्यांमध्ये ४५० धावा केल्या आहेत. अंतिम फेरी गाठण्यासाठी दिल्लीला शुक्रवारच्या सामन्यात चेन्नईविरुद्ध अशीच आक्रमक खेळी करावी लागणार आहे. त्यामुळे या महत्वाच्या सामन्यात ऋषभ पंतच्या खेळाकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.