सलामीवीर ख्रिल लिन आणि सुनीन नरिनच्या आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सवर ८ गडी राखून मात केली आहे. राजस्थानने दिलेलं १४० धावांचं आव्हान कोलकात्याने सहज पूर्ण केलं. कोलकात्याच्या सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी ९१ धावांची भक्कम भागीदारी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. राजस्थानकडून श्रेयस गोपाळने २ बळी घेतले.

ख्रिस लिन आणि सुनील नरिन यांच्या फटकेबाजीला अंकुश लावण्याचे सर्व प्रयत्न आजच्या सामन्यात व्यर्थ ठरले. सुनिल नरिन ४७ धावांवर बाद झाला. लिनने आपलं अर्धशतक केलं, मात्र गोपाळने त्याला तात्काळ माघारी धाडलं. यानंतर विजयाची औपचारिकता रॉबीन उथप्पा आणि शुभमन गिल या जोडीने पूर्ण केली. जोफ्रा आर्चरचा अपवाद वगळता राजस्थानच्या सर्व गोलंदाजांना कोलकात्याच्या फलंदाजाच्या फटकेबाजीचा प्रसाद खावा लागला.

त्याआधी,स्टिव्ह स्मिथच्या संयमी अर्धशतकी खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने घरच्या मैदानावर खेळत असताना १३९ धावांपर्यंत मजल मारली. स्टिव्ह स्मिथचं संयमी अर्धशतक आणि त्याला जोस बटलरने दिलेल्या भक्कम साथीमुळे राजस्थानने हा पल्ला गाठला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा कोलकात्याचा निर्णय अगदी योग्य ठरला. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेला तात्काळ माघारी धाडण्यात कोलकात्याचे गोलंदाज यशस्वी ठरले. प्रसिध कृष्णाने त्याचा बळी घेतला.

यानंतर जोस बटलर आणि स्टिव्ह स्मिथ जोडीने खेळपट्टीवर ठाण मांडत संघाचा डाव सावरला. दोघांमध्येही दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी झाली. जोस बटलर माघारी परतल्यानंतर राहुल त्रिपाठीही हजेरीवीर ठरून माघारी परतला. मात्र स्टिव्ह स्मिथने जोस बटलरच्या साथीने संघाची बाजू लावून धरली. यादरम्यान स्मिथने आपलं अर्धशतकही साजरं केलं. त्याने ७३ धावांची खेळी केली. कोलकात्याच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत अखेरच्या षटकात राजस्थानच्या फलंदाजांना हात मोकळे करण्याची संधी दिली नाही. कोलकात्याकडून हॅरी गुर्नेयने २ तर प्रसिध कृष्णाने १ बळी घेतला.

Live Blog

22:58 (IST)07 Apr 2019
विजयाची औपचारिकता रॉबिन उथप्पा-शुभमन गिल जोडीकडून पूर्ण

८ गडी राखून कोलकाता विजयी

22:40 (IST)07 Apr 2019
ख्रिस लिन माघारी, कोलकात्याला दुसरा धक्का

श्रेयस गोपाळला सामन्यात दुसरा बळी

22:32 (IST)07 Apr 2019
अखेर कोलकात्याचा पहिला गडी माघारी, नरीन बाद

श्रेयस गोपाळने घेतला बळी

22:32 (IST)07 Apr 2019
सुनिल नरिन आणि ख्रिस लिन जोडीची आक्रमक सुरुवात

पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत संघाची बाजू केली भक्कम

21:37 (IST)07 Apr 2019
राजस्थानची १३९ धावांपर्यंत मजल

कोलकात्याला विजयासाठी १४० धावांचं आव्हान

21:12 (IST)07 Apr 2019
राजस्थानला तिसरा धक्का, त्रिपाठी बाद

गुर्नेयच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात पियुष चावलाने घेतला झेल

20:55 (IST)07 Apr 2019
जोस बटलर माघारी, राजस्थानला तिसरा धक्का

हॅरी गुर्नेयला मिळाला बळी

20:54 (IST)07 Apr 2019
जोस बटलर - स्टिव्ह स्मिथ जोडीची भागीदारी

दोघांच्या भागीदारीमुळे राजस्थानचा डाव सावरला

20:06 (IST)07 Apr 2019
नाणेफेक जिंकून कोलकात्याची प्रथम गोलंदाजी, राजस्थानचा पहिला गडी लवकर माघारी

प्रसिध कृष्णाच्या गोलंदाजीवर अजिंक्य पायचीत

Story img Loader