आयपीएलच्या बाराव्या हंगामात मुंबई इंडियन्सचा संघ पहिल्यांदाच रोहित शर्माच्या अनुपस्थितीत मैदानात उतरतो आहे. मंगळवारी सरावादरम्यान रोहित शर्माला दुखापत झाल्याचं समोर आलं. रोहितच्या डाव्या पायाला दुखापत झाल्यामुळे मुंबईच्या गोटात चिंतेचं वातावरण होतं. या घटनेनंतर मुंबई इंडियन्स संघाचे फिजीओ नितीन पटेल यांनी रोहित शर्माला मैदानातून बाहेर नेले. रोहितची दुखापत फारशी गंभीर नसली तरीही आगामी काळातील सामने व विश्वचषक लक्षात घेता मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे.

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत कायरन पोलार्ड मुंबईच्या संघाचं नेतृत्व करतो आहे. या प्रकारामुळे रोहित शर्माच्या नावावर एक वेगळी घटना नोंदवली गेली आहे. 2011 साली मुंबई संघाचा भाग झाल्यापासून, पहिल्यांदा मुंबई इंडियन्स संघ रोहित शर्माशिवाय मैदानात उतरतो आहे. आतापर्यंत आयपीएलच्या इतिहासात रोहित शर्माला विश्रांती देण्याचा हा दुसरा सामना ठरला आहे. 2008 साली डेक्कन चार्जर्स संघाकडून खेळताना रोहितला विश्रांती दिली गेली होती.

दरम्यान रोहित शर्माच्या अनुपस्थितीत मुंबईने सिद्धेश लाडला आपल्या संघात स्थान दिलेलं आहे.

Story img Loader