प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं पण सारखं-सारखं हरणं जगावेगळा ताप आहे. आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्यानं नुसत जिंकत राहवं आणि त्याचा भन्नाट खेळ पाहून आपल्या डोळ्यांचं पारणं फिटावं अशी इच्छा बाळगून आयपीएल पाहणाऱ्या रॉयल चॅलेंजर्सवाल्या फॅन्सचा नेहमीच स्वप्नभंग झालाय. एखाद्या लैलावर जीवापाड प्रेम करणाऱ्या मजनुला नकार मिळाल्यावर त्यानं कोमात जावं, अशीच काहीशी अवस्था त्यांच्या चाहत्यांची यंदाच्या आयपीएलमध्येही झाली आहे. अशा वेळी आपल्या प्रेमाआड येणाऱ्या विलनला शोधाव की ‘त्या’ लाल जर्सीवर शतदा प्रेम कराव, असा गोंधळही त्यांच्या मनात निर्माण झाला असेल. याचं कारण यंदाही बंगळुरुचा प्रवास ‘ये रे माझ्या मागल्या…’ प्रमाणेच सुरु आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आंतरराष्ट्रीय मैदानावर यारों फुल बरसाओं….हमारी रन मशिन आयी है! या तोऱ्यात स्वागत होत असलेल्या विराट कोहलीचा फॉर्म अचानक गायब झालाय. एकेकाळी ३६० अशांत फिरणाऱ्या एबीचा चेंडू सीमारेषेच्या बिंदू पर्यंत पोहचेना झालाय.  छोटा जादूगार (पार्थिव पटेल) आपल्यातील जादू दाखवण्याचा प्रयत्न करतोय पण त्याला साथ द्यायला कोण तयार नाही. परिणामी यंदाच्या आयपीएलमध्ये बंगळुरुने पराभवाचा निराशाजनक षटकार ठोकलाय. या परिस्थितीत ‘अपना टाइम आएगा’ हे गाणं म्हणण्याशिवाय चाहत्यांकडे किंवा संघाकडे दुसरा काही पर्याय उरलेला नाहीये.

दहावर्षांपूर्वी पहिल्या आयपीएलमध्ये राहुल द्रविड, जॅक कॅलिस, अनिल कुंबळे, झहिर खान, मार्क बाउचर आणि डेल स्टेन या तगड्या खेळाडूंसह बंगळुरुने आपला प्रवास सुरु केला. त्यानंतर २०११ पासून या ताफ्यात विराट, गेल आणि एबी हे स्फोटक फलंदाज सामील झाले. बंगळुरुने २००९, २०११ आणि २०१६ मध्ये फायनलमध्येही धडक मारली, पण आयपीएलमध्ये नाव कोरण्यात त्यांना यश आले नाही. गेल्या दोन हंगामातील त्यांच्या कामगिरीचा ढासाळलेला स्तर अनपेक्षित असाच आहे.

अवश्य वाचा – IPL 2019 : RCB च्या कामगिरीचा आलेख घसरताच, नकोशा विक्रमाची बरोबरी

ब्लू जर्सीत सातत्याने शतकी खेळी करुन भारतीय संघाला विजयाची सवय लावणाऱ्या भारतीय कर्णधार कोहलीचं नेतृत्व बंगळुरुसाठी योग्य ठरताना दिसतंय. त्याच्या भक्तांना ही अंधश्रद्धा वाटत असली तरी आकडेवारी तरी हेच सांगते. यातून ब्लू जर्सी मिळवत असलेल्या सामन्यात विराटच्या नेतृत्वाचा खरंच प्रभाव असतो का ? असा प्रश्नही एखाद्याला पडू शकतो.

स्पर्धेतील सलग चार सामने गमावल्यानंतर बंगळुरुचं सगळं संपलय असं नाही. विराट, एबी, हेटमायर, अली यांच्यातील क्रिकेट ‘इश्किया’ जागा झाला तर ‘डिशक्यांव डिशक्यांव..’ करत बंगळुरुच्या आशा निश्चितच पुन्हा पल्लवित होवू शकतात. पण हा इश्काचा रंग दिसणार कधी? आणि जरी दिसला तरी तळाला राहून आयपीएल जिंकायला ते मुंबईकर नाहीत हे पण लक्षात ठेवा बरं.

अवश्य वाचा – IPL 2019 : सामना गमावूनही विराटचा विक्रम

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2019 special blog on rcb and virat kohli performance in 12th season