IPL 2019 SRH vs KXIP Live Updates : डेव्हिड वॉर्नरचं (८१) अर्धशतक आणि त्याला मधल्या फळीत अन्य फलंदाजांनी दिलेल्या साथीमुळे हैदराबादने २१२ धावांपर्यंत मजल मारली. डेव्हिड वॉर्नरने आपला धडाकेबाज फॉर्म कायम राखत पंजाबच्या गोलंदाजांचा यथेच्छ समाचार घेतला. हैदराबादच्या फलंदाजीवर अंकुश लावण्यात पंजाबचे गोलंदाज आज अपयशी ठरले. त्यामुळे हैदराबादने पंजाबला २१३ धावांचं आव्हान दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या सामन्यात पंजाबच्या गोलंदाजांनी एक लाजिरवणारा विक्रम आपल्या नावे केला. IPL च्या इतिहासात आजपर्यंत न घडलेला प्रकार या सामन्यात घडला. पंजाबच्या सलामीच्या गोलंदाजांनी चक्क १०० हून अधिक धावा खर्च केल्या. पंजाबकडून अर्षदिप सिंग आणि मुजीब ऊर रहमान ही सलामीची गोलंदाजी जोडी होती. या दोघांनी मिळून चक्क १०८ धावा दिल्या. यात अर्षदिप सिंगने ४२ धावा देत २ बळी टिपले, तर मुजीबने ६६ धावा देत २ बळी घेतले.

त्याआधी आपला अखेरचा सामना खेळणाऱ्या वॉर्नरने पहिल्या विकेटसाठी वृद्धीमान साहासोबत ७८ धावांची भागीदारी केली. साहा (२८) माघारी परतल्यानंतर वॉर्नरने मनिष पांडेच्या साथीने डावाला पुन्हा एकदा आकार दिला. दोन्ही खेळाडूंची पंजाबची गोलंदाजी व्यवस्थित खेळून काढत धावफलक हलता ठेवला. या दरम्यान वॉर्नरने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. त्याने ५६ चेंडूत ८१ धावांची खेळी केली. या खेळीत ७ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. रविचंद्रन आश्विनने पांडेला (३६) माघारी धाडत हैदराबादची जमलेली जोडी फोडली.

यानंतर डेव्हिड वॉर्नरही माघारी परतला. मधल्या फळीतल्या फलंदाजांनी यावेळी आपली जबाबदारी ओळखत फटकेबाजी करत संघाला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. पंजाबच्या गोलंदाजांनी अखेरच्या षटकांमध्ये चांगली कामगिरी केली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. पंजाबकडून रविचंद्रन आश्विन आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी २-२ फलंदाजांना माघारी धाडलं. त्यांना अर्शदीप सिंह आणि मुरगन आश्विनने १ बळी घेत चांगली साथ दिली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2019 srh vs kxip punjab opening bowlers give 100 runs for a side in ipl match for first time