आयपीएलच्या बाराव्या हंगामाची अंतिम फेरी गाठण्यासाठी दिल्ली आणि चेन्नईचे संघ आज समोरासमोर येणार आहेत. चेन्नई हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखला जातो. मात्र दिल्लीच्या संघात यंदाच्या हंगामामध्ये झालेला बदल पाहता आजचा सामना हा नक्कीच चुरशीचा होईल यात शंका नाही. मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्यात चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला. तर दिल्लीने हैदराबादवर मात करत आपलं आव्हान कायम राखलं.
दिल्लीच्या संघाला आजच्या सामन्यात विजय मिळवायचा असेल तर यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतचं फॉर्मात येणं गरजेचं आहे. यंदाच्या हंगामातली आकडेवारी ही त्याचीच साक्ष देते आहे. दिल्लीने साखळी फेरीत ९ सामन्यांमध्ये विजय संपादन केला. या सर्व सामन्यांमध्ये पंतने आक्रमक फलंदाजी केली आहे. ५९.६६ च्या सरासरीने पंतने ९ सामन्यात ३५८ धावा केल्या आहेत. या सामन्यांमध्ये पंतचा स्ट्राईक रेट १७९ इतका होता.
मात्र ज्या ५ सामन्यांमध्ये दिल्ली हरली, तिकडे पंत लवकर तंबूत परतला होता. पराभूत झालेल्या ५ सामन्यांत ऋषभ पंतने केवळ ८१ धावा केल्या आहेत. या सामन्यांमध्ये पंतची सरासरी १६.२० इतकी होती. त्यामुळे आजच्या सामन्यात दिल्लीला विजय मिळवायचा असेल तर ऋषभ पंतने फॉर्मात असणं गरजेचं आहे. आजच्या सामन्यातला विजयी संघ अंतिम फेरीत मुंबईशी दोन हात करणार आहे.