आयपीएलच्या बाराव्या हंगामात सनराईजर्स हैदराबाद संघाकडून ऑस्ट्रेलियाचा खेळाडू डेव्हिड वॉर्नरने दमदार पुनरागमन केलं. केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत भुवनेश्वर कुमारने हैदराबाद संघाचं नेतृत्व केलं. यावेळी पहिल्यांदा फलंदाजी करण्याची संधी मिळालेल्या डेव्हिड वॉर्नरने दमदार फटकेबाजी करत प्रेक्षकांची मनं जिंकली. वॉर्नरने पहिल्याच सामन्यात 85 धावांची खेळी केली.

महत्वाची गोष्ट म्हणजे मागच्या वर्षी याच दिवशी बॉल टॅम्परिंग प्रकरण समोर आलं होतं. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यात डेव्हिड वॉर्नर, कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि कॅमरुन बॅनक्रॉफ्ट यांनी बॉल टॅम्परिंग केलं होतं. यानंतर तिन्ही खेळाडूंवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बंदी घातली होती. मध्यंतरीच्या काळात वॉर्नर हा क्रिकेटपासून दूर होता.

काही कालावधीनंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने तिन्ही खेळाडूंना टी-20 क्रिकेटमध्ये खेळण्याची परवानगी दिली. या दिवसानंतर बरोबर वर्षभराने वॉर्नरने 85 धावांची खेळी करत आपलं पुनरागमन दणक्यात साजरं केलं. या खेळीदरम्यान वॉर्नरने केवळ 53 चेंडूचा सामना केला, ज्यामध्ये 4 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या हैदराबादने 181 धावांपर्यंत मजल मारली.

अवश्य वाचा – IPL 2019 : पहिल्या सामन्यातील विजयानंतरही धोनी चिंतेत, जाणून घ्या कारण..

Story img Loader