आयपीएलच्या बाराव्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाने अंतिम फेरीच्या दिशेने आपलं एक पाऊल पुढे टाकलं आहे. बुधवारी झालेल्या सामन्यात दिल्लीने हैदराबादवर २ गडी राखून मात केली. एका क्षणाला दिल्ली सामना गमावेल अशी परिस्थिती असताना ऋषभ पंतने ४९ धावांची खेळी करत सामन्याचं पारडं आपल्या संघाच्या बाजूने फिरवलं. त्याने या खेळीत २ चौकार आणि ५ षटकार लगावले. त्याच्या या खेळीने अभिनेते ऋषी कपूर चांगलेच प्रभावित झाले आहेत. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांना पंत, विश्वचषक संघात का नाही असा प्रश्न विचारला आहे.

दरम्यान, मागच्या दाराने बाद फेरीत प्रवेश करणाऱ्या सनराईजर्स हैदराबाद संघाचा आयपीएलच्या बाराव्या हंगामातला प्रवास अखेर संपुष्टात आलं आहे. विशाखापट्टणमच्या मैदानावर खेळवण्यात येणाऱ्या सामन्यात दिल्लीने हैदराबादवर २ गडी राखून मात केली. सलामीवीर पृथ्वी शॉने झळकावलेलं अर्धशतक आणि त्याला मधल्या फळीत ऋषभ पंतने फटकेबाजी करत दिलेली साथ या जोरावर दिल्लीने सामन्यात विजय मिळवला. दिल्लीचा पुढचा सामना चेन्नईविरुद्ध रंगणार आहे. या दोन्ही संघांमधला विजेता अंतिम फेरीत मुंबईविरुद्ध खेळेल.

१६३ धावांचा पाठलाग करताना दिल्लीच्या फलंदाजांनी आश्वासक सुरुवात केली. पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी पहिल्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी केली. अखेरीस दिपक हुडाने धवनला माघारी धाडत दिल्लीची जमलेली जोडी फोडली. यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरही खलिल अहमदच्या गोलंदाजीवर तात्काळ माघारी परतला. दरम्यान पृथ्वी शॉने एक बाजू लावून धरत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. खलिल अहमदने पृथ्वीला माघारी धाडत दिल्लीला आणखी एक धक्का दिला.

यानंतर राशिद खानने एकाच षटकात दोन बळी घेत दिल्लीला बॅकफूटला ढकललं. मात्र यानंतर ऋषभ पंतने धुवाँधार फटकेबाजी करत दिल्लीचं पारडं सामन्यात पुन्हा एकदा जड केलं. अखेरच्या षटकात अमित मिश्रा माघारी परतल्यामुळे सामना रंगतदार अवस्थेत पोहचला होता. मात्र अखेरीस किमो पॉलने विजयासाठी आवश्यक असलेल्या धावा पूर्ण करत दिल्लीने हैदराबादच्या आशांवर पाणी फिरवलं. ऋषभ पंतनेही धावांची खेळी केली. हैदराबादकडून खलिल अहमद, राशिद खानने आणि भुवनेश्वर कुमारने २-२ बळी घेतले. त्यांना दिपक हुडाने १ बळी घेत चांगली साथ दिली.

Story img Loader