IPL 2019 या स्पर्धेचे बहुप्रतिक्षित वेळापत्रक काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले. २३ मार्चपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून या स्पर्धेच्या पहिल्या २ आठवड्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ही स्पर्धा सुरू होण्याआधीच या स्पर्धेचा विजेता कोण होणार, याबाबत मत व्यक्त करण्यात येत आहेत. या दरम्यान, किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ गेल्या ११ हंगामाची कसर भरून काढेल आणि यंदाचे विजेतेपद पटकावले असे मत मध्यमगती गोलंदाज अंकित राजपूत याने व्यक्त केले आहे.

मोहम्मद शमी हा एक उत्तम गोलंदाज आहे. त्याच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. मला त्याच्याबरोबर एकाच अकादमीत वेळ घालवण्याची संधी मिळाली. त्यामुळे मी त्याची कामगिरी जाणतो. त्यांनतर त्याने दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर केलेली कामगिरीदेखील आपणा साऱ्यांना माहिती आहे. यंदाच्या हंगामात शमीच्या बरोबर गोलंदाजी करताना मला नक्कीच छान वाटेल. मी खरे तर माझे हे भाग्यच समजतो. आम्ही आतापासूनच खांद्याला खांदा लावून खेळण्यास सुरुवात केली आहे. आम्ही यंदाचे IPL जिंकून गेल्या ११ हंगामातील कसर भरून काढू, असे तो म्हणाला.

राजपूतने यंदाच्या रणजी करंडक स्पर्धेत ८ सामन्यात ४२ बळी टिपले. यात ३ वेळा त्याने एका डावात ५ बळी टिपण्याची कामगिरी केली होती. पुढे बोलताना तो म्हणाला की सय्यद मुश्ताक अली स्पर्धा हि IPL साठीची रंगीत तालीम होती. IPL च्या तयारीसाठी या स्पर्धेतील सामन्यांचा प्रचंड फायदा होईल असा मला विश्वास आहे. या स्पर्धत मला चांगली कामगिरी आली. त्याच पद्धतीची कामगिरी IPL मध्ये करण्याचा माझा मानस आहे.

दरम्यान, या स्पर्धेचा पहिला सामना हा चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू असा रंगणार आहे. माजी कर्णधार विरुद्ध सध्याचा कर्णधार असा सामना असणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे. तसेच आजी-माजी कर्णधारांमधील लढतींबरोबरच दुसऱ्या दिवशी या स्पर्धेत भारताच्या दोन सलामीवीरांमधील सामना रंगणार आहे. रोहित शर्माचा मुंबई इंडियन्स संघ विरुद्ध शिखर धवनचा दिल्ली कपिटल्स संघ या स्पर्धेच्या पहिल्याच आठवड्यात आमनेसामने येणार आहेत. २४ मार्चला हा सामना मुंबईच्या घरच्या मैदानावर रंगणार आहे. पण या स्पर्धेमध्ये सुरुवातीला पंजाबच्या संघात असलेला युवराज मुंबईच्या संघातून यंदाचे IPL खेळणार असल्याने या सामन्यालाही तितकेच महत्व असणार आहे.

Story img Loader