IPL 2020 Auction : IPL च्या आगामी हंगामासाठी कोलकातामध्ये लिलाव प्रक्रिया पार पडली. या लिलावात ३३० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला. लिलाव प्रक्रियेत ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला. या लिलाव प्रक्रियेत अनेक भारतीय खेळाडूदेखील स्पर्धेत उतरले होते. त्यापैकी काहींवर अपेक्षित बोली लागली. तर काहींवर बोली लावण्यात कोणीच रस दाखवला नाही. यात TOP 5 महागड्या खेळाडूंमध्ये एकाही भारतीय खेळाडूला स्थान मिळाले नाही. पण या लिलावात एक खेळाडू असाही ठरला जो वेगवेगळ्या ८ संघांकडून खेळणार आहे. तो खेळाडू म्हणजे ऑस्ट्रेलियाचा दमदार सलामीवीर अ‍ॅरोन फिंच. यंदाच्या लिलावात त्याला बंगळुरू संघाने खरेदी केले.

IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर बंगळुरूचा संपूर्ण संघ

IPL 2020 मध्ये बंगळुरूच्या संघाने ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघाचा कर्णधार अ‍ॅरोन फिंच याला संघात दाखल करून घेतले. गुरूवारी झालेल्या लिलावात त्याच्यावर ४ कोटी ४० लाखांची बोली लागली. बंगळुरू हा फिंचचा IPL स्पर्धेतील आठवा संघ ठरला. फिंचने २०१० मध्ये IPL कारकिर्दीची सुरूवात राजस्थान रॉयल्स संघाकडून केली. त्या पुढील दोन हंगाम त्याने दिल्ली संघाचे प्रतिनिधित्व केले. नंतर पुढच्या हंगामात त्याला पुणे वॉरियर्स संघाने विकत घेतले. तर २०१४ च्या IPL मध्ये तो हैदराबाद संघाकडून आणि २०१५ मध्ये तो मुंबई इंडियन्सच्या संघाकडून मैदानात उतरला.

त्यानंतर २०१६ साली तो गुजरात लायन्स संघाचा खेळाडू ठरला. गुजरात संघ IPL मधून बाहेर गेल्यानंतर तो कोणत्याही संघात नव्हता. पण २०१८ च्या लिलावात पंजाबच्या संघाने त्याच्यावर बोली लावली. IPL मध्ये ८ संघांकडून खेळणारा तो पहिला खेळाडू ठरला. तसेच ६ पेक्षा जास्त संघांकडून खेळणाराही तो एकमेव खेळाडू ठरला आहे. या आधी युवराज सिंग आणि पार्थिव पटेल हे दोघे ६ वेगवेगळ्या संघातून खेळलेले आहेत.

Story img Loader