जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सला नाताळाआधीच मोठं गिफ्ट मिळालं आहे. आयपीएलच्या आगामी तेराव्या हंगामासाठीच्या लिलावात कमिन्सवर बंपर बोली लागली आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाने कमिन्सवर १५ कोटी ५० लाखांची बोली लावत त्याला आपल्या संघात दाखल करुन घेतलं आहे.

या रेकॉर्डब्रेक बोलीसह पॅट कमिन्स आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक बोली मिळवणारा परदेशी खेळाडू ठरला आहे. २०१७ साली इंग्लंडच्या बेन स्टोक्सवर पुणे संघाने १४ कोटी ५० लाखांची बोली लावली होती. कमिन्सने आज हा विक्रम आपल्या नावे जमा केला आहे. या विक्रमी बोलीनंतर पॅट कमिन्सने एका व्हिडीओद्वारे आपला आनंद व्यक्त केला असून, कोलकात्याकडून खेळण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं म्हटलं आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांमध्ये कमिन्सला आपल्या संघात दाखल करुन घेण्यासाठी चढाओढ सुरु होती. कमिन्सने १० कोटींचा टप्पा ओलांडल्यानंतर अचानक कोलकाता संघाने शर्यतीत उडी मारत कमिन्सवर १५ कोटी ५० लाखांची बोली लावत अखेरच्या क्षणांमध्ये बाजी मारली. कमिन्स आयपीएल इतिहासातला सर्वात जास्त बोलीचा विक्रम मोडणार असं वाटत होतं, मात्र केवळ ५० लाखांनी त्याची ही संधी हुकली. २०१५ साली दिल्लीच्या संघाने युवराज सिंहवर १६ कोटी रुपयांची बोली लावली होती.

अवश्य वाचा – IPL 2020 Auction : दोन हंगाम महागडा खेळाडू ठरलेल्या जयदेव उनाडकटची घसरगुंडी

Story img Loader