आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीच्या लिलावाचा कोलकाता शहरात मोठ्या उत्साहात श्रीगणेशा झाला. पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या खेळाडूंचं वर्चस्व पहायला मिळालं. जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या पॅट कमिन्ससाठी यंदा संघमालकांचची चढाओढ पहायला मिळाली.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांमध्ये कमिन्सला आपल्या संघात दाखल करुन घेण्यासाठी चढाओढ सुरु होती. कमिन्सने १० कोटींचा टप्पा ओलांडल्यानंतर अचानक कोलकाता संघाने शर्यतीत उडी मारत कमिन्सवर १५ कोटी ५० लाखांची बोली लावत अखेरच्या क्षणांमध्ये बाजी मारली. कमिन्स आयपीएल इतिहासातला सर्वात जास्त बोलीचा विक्रम मोडणार असं वाटत होतं, मात्र केवळ ५० लाखांनी त्याची ही संधी हुकली. २०१५ साली दिल्लीच्या संघाने युवराज सिंहवर १६ कोटी रुपयांची बोली लावली होती.
२०२० आयपीएल लिलावाच्या पहिल्या फेरीतले सर्वात महागडे खेळाडू –
- पॅट कमिन्स – १५ कोटी ५० लाख – कोलकाता नाईट रायडर्स
- ग्लेन मॅक्सवेल – १० कोटी ७५ लाख – किंग्ज इलेव्हन पंजाब
- ख्रिस मॉरिस – १० कोटी – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
- सॅम करन – ५ कोटी ५० लाख – चेन्नई सुपरकिंग्ज
- इयॉन मॉर्गन – ५ कोटी २५ लाख – कोलकाता नाईट रायडर्स