IPL 2020 Auction : IPL च्या आगामी हंगामासाठी कोलकातामध्ये लिलाव प्रक्रिया पार पडली. या लिलावात ३३० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला. लिलाव प्रक्रियेत ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला. या लिलाव प्रक्रियेत अनेक भारतीय खेळाडूदेखील स्पर्धेत उतरले होते. त्यापैकी काहींवर अपेक्षित बोली लागली. तर काहींवर बोली लावण्यात कोणीच रस दाखवला नाही. चेन्नईच्या संघाकडे लिलाव प्रक्रियेआधी सर्वात कमी रक्कम होती. त्यानुसार सावधपणे त्यांनी खेळाडूंची खरेदी केली.
पाहूया लिलावानंतर चेन्नईचा संपूर्ण संघ
फलंदाज – फाफ डु प्लेसिस, अंबाती रायुडू, मुरली विजय, ऋतुराज गायकवाड, सुरेश रैना
गोलंदाज – हरभजन सिंग, इम्रान ताहीर, दीपक चहर, केएम आसीफ, लुंगी एनगीडी, शार्दूल ठाकूर, पियुष चावला (६.७५ कोटी), जोश हेजलवूड (२ कोटी), आर साई किशोर (२० लाख)
अष्टपैलू – शेन वॉटसन, ड्वेन ब्राव्हो, केदार जाधव, रवींद्र जाडेजा, मिचेल सॅन्टनर, मोनू कुमार, करन शर्मा, सॅम करन (५.५० कोटी)
यष्टिरक्षक – महेंद्रसिंग धोनी, नारायणन जगदीसन
अशी पार पडली लिलाव प्रक्रिया
पहिल्या टप्प्यात बोली लागलेल्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मालामाल झाले. पॅट कमिन्स आणि ग्लेन मॅक्सवेल या दोघांना १० कोटींहून अधिकची बोली लागली. लिलावाच्या दुसऱ्या टप्प्यात अनेक खेळाडू UNSOLD राहिले. कागदावर महत्त्वाच्या वाटणाऱ्या काही खेळाडूंवर कोणीही बोली लावली नाही. आश्चर्याची बाब म्हणजे फिरकीपटू पियुष चावलाला अनपेक्षित बोली लागली. त्याला चेन्नईच्या संघाने विकत घेतले. तिसऱ्या टप्प्यात भारतीय युवा खेळाडूंचा भरणा असला, तरी त्यांच्यावर बोली लावण्यात संघांनी फारसा रस दाखवला नाही. चौथ्या टप्प्यात धक्कादायकरित्या अनेक मोठ्या आणि नावाजलेल्या खेळाडूंना कोणीही वाली मिळाला नाही. मार्टिन गप्टिल, कार्लोस ब्रेथवेट, मुस्तफिजूर रहमान, बेन कटिंग यासारख्या अनेक खेळाडूंना खरेदी करण्यात कोणत्याही संघमालकाने रस दाखवला नाही. तर शेवटच्या टप्प्यात ताज्या यादीतील काही खेळाडूंसह पहिल्या फेरीत UNSOLD राहिलेल्या खेळाडूंनाही पुन्हा लिलावासाठी ठेवण्यात आले. त्यात काही खेळाडूंवर बोली लावण्यात आली.