IPL 2020 Auction : IPL च्या आगामी हंगामासाठी कोलकातामध्ये लिलाव प्रक्रिया पार पडली. या लिलावात ३३० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला. लिलाव प्रक्रियेत ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला. या लिलाव प्रक्रियेत अनेक भारतीय खेळाडूदेखील स्पर्धेत उतरले होते. त्यापैकी काहींवर अपेक्षित बोली लागली. तर काहींवर बोली लावण्यात कोणीच रस दाखवला नाही. या लिलाव प्रक्रियेअंती TOP 5 महागड्या खेळाडूंमध्ये एकाही भारतीय खेळाडूला स्थान मिळाले नाही. पण भारतीय खेळाडूंमध्ये देखील काही खेळाडूंनी चांगला भाव खाल्ला.
पाहूया सर्वात महागडे ठरलेले ५ भारतीय खेळाडू
पियुष चावला – भारताचा अनुभवी फिरकीपटू पियुष चावला याला चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने खरेदी केले. पियुष चावलावर चेन्नईने ६ कोटी ७५ लाखांची बोली लावली आणि त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतला.
वरूण चक्रवर्ती – गेल्या हंगामात सर्वात महाग म्हणजेच ८ कोटी ४० लाख इतकी वरूण चक्रवर्ती याच्यावर बोली लागली होती. पण त्याला फारशी संधी मिळाली नाही. त्याला जितकी संधी मिळाली, त्यात त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. तरीदेखील त्याला यंदाच्या लिलावात त्याला ४ कोटींच्या बोलीसह कोलकाता नाईट रायडर्स संघाने आपल्या संघात सामील करून घेतले.
रॉबिन उथप्पा – अनुभवी धडाकेबाज खेळाडू रॉबिन उथप्पा याला कोलकाता संघाने करारमुक्त केले. पण त्याला नवा संघ सापडला. ३ कोटींच्या बोलीसह राजस्थान रॉयल्सने त्याला आपल्या संघात स्थान दिले.
जयदेव उनाडकट – गेल्या हंगामात ८ कोटी ४० लाखांच्या सर्वाधिक बोलीसह तो राजस्थानच्या संघात होता. यंदाही त्याला राजस्थान रॉयल्सच्या संघाने विकत घेतले. त्याच्यावर ३ कोटींची बोली लावण्यात आली.
यशस्वी जैस्वाल – स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणारा यशस्वी जैस्वाल याला त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले. २ कोटी ४० लाखांच्या बोलीसह त्याला राजस्थान रॉयल्स संघाने ताफ्यात सामील करून घेतले.