युएईत दाखल झालेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील १२ जणांना करोनाची लागण झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या खेळाडूचं नाव CSK प्रशासनाने जाहीर केलं नसलं तरीही टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार दीपक चहरचा करोना अहवाल पॉझिटीव्ह आलेला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून दिपक चहरसह अन्य १२ जणांना विलगीकरण कक्षात हलवण्यात आलं असून त्यांना आपला क्वारंटाइन कालावधी पूर्ण करुन…करोना निगेटीव्ह असल्याचा अहवाल घेऊन परत संघात दाखल होता येणार आहे.
१९ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या स्पर्धेला कोणताही धोका नसल्याचं बीसीसीआयमधील सूत्रांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितलं असलं तरीही स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. “योग्य ती खबरदारी घेतली जात आहे, सध्यातरी स्पर्धेला कोणताही धोका नाही. पण सध्या घडत असलेल्या घडामोडींमुळे वेळापत्रकाची घोषणा उशीराने करण्यात येईल”, अशी माहिती बीसीसीआयमधील सूत्रांनी दिली आहे.
अवश्य वाचा – Viral Video : CSK च्या खेळाडूंकडून BCCI नियमांचा भंग?? सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा…
दरम्यान, चेन्नई सुपरकिंग्ज संघासमोरच्या अडचणी काहीकेल्या कमी होत नाहीयेत. संघाचा महत्वाचा खेळाडू सुरेश रैनाने आयपीएलच्या तेराव्या हंगामातून माघार घेतली आहे. सुरेश रैनानने भारतात परतण्याचा निर्णय घेतला आहे. CSK चे सीईओ काशी विश्वनाथन यांनी ही माहिती दिली आहे. वैय्यक्तीक कारणांमुळे सुरेश रैनाने यंदाच्या हंगामात न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने भारतात परतण्याचा निर्णय घेतला असून आम्ही सुरेश रैना आणि त्याच्या परिवारासोबत आहोत अशी माहिती काशी विश्वनाथन यांनी दिली आहे.