चेन्नई सुपरकिंग्जने आयपीएलच्या तेराव्या हंगामाची जय्यत तयारी सुरु केली आहे. महेंद्रसिंह धोनीसह सुरेश रैना व इतर महत्वाचे खेळाडू चेन्नई सुपरकिंग्जच्या सराव शिबीरासाठी चेन्नईत दाखल झाले आहेत. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा युएईमध्ये खेळवली जाणार आहे. या स्पर्धेआधी आपल्या खेळाडूंसाठी चेन्नई सुपरकिंग्जने १५ ऑगस्ट ते २० ऑगस्ट दरम्यान आपल्या खेळाडूंसाठी शिबीर आयोजित केलं आहे. एम.ए.चिदंबरम मैदानात चेन्नईचे खेळाडू सराव करतील. चेन्नई संघातले महत्वाचे दोन खेळाडू केदार जाधव आणि ऋतुराज गायकवाड हे देखील विशेष विमानाने चेन्नईत दाखल झाले आहेत.

१४ ऑगस्ट रोजीच केदार आणि ऋतुराज विशेष विमानाने चेन्नईला पोहचले. आपले फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या दोघांव्यतिरीक्त कर्ण शर्मा, पियुष चावला, दीपक चहर ही मंडळीही चेन्नईत दाखल झाली आहेत. परदेशी खेळाडूंना अद्याप या सराव शिबीरात सहभागी होण्याची संधी मिळालेली नसली तरीही संघ युएईत दाखल झाल्यानंतर परदेशी खेळाडू संघात सहभागी होतील. शिबीर आयोजित करण्याआधी चेन्नई संघ व्यवस्थापनाने करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता काटेकोर काळजी घेतली आहे. तसेच युएईला रवाना होण्याआधी सर्व खेळाडूंची करोना चाचणी केली जाणार आहे.