आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा लिलाव नुकताच कोलकाता शहरात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडूंवर या लिलावात बोली लावण्यात आली. २०२० हंगामाची सुरुवात कधी होणार यावर अद्याप विचारमंथन सुरु असलं, तरीही बीसीसीआय आगामी हंगामाचा अंतिम सामना अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर खेळवण्याच्या विचारात आहे.

मोटेरा स्टेडीयमचं बांधकाम अद्याप सुरु आहे. मात्र हे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर मोटेरा मैदान जगातलं सर्वात मोठं क्रिकेटचं मैदान ठरणार आहे. या मैदानाची आसनक्षमता १ लाख १० हजार इतकी आहे. त्यामुळे अंतिम सामन्याला प्रेक्षकांची अधिक उपस्थिती मिळावी यासाठी बीसीसीआय मोटेरा मैदानावर अंतिम सामन्याचं आयोजन करण्याच्या विचारात असल्याचं समजतंय. India Today वृत्तसमुहाने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. त्यामुळे हे वृत्त खरं ठरल्यास गुजरातकडे पहिल्यांदा आयपीएलचं यजमानपद भूषवण्याची संधी येणार आहे.

दरम्यान, २०२० साली होणारा आयपीएलच्या तेराव्या हंगामात महत्वाचा बदल होणार आहे. स्पर्धा मध्यावधीवर आलेली असताना, संघातील Capped खेळाडूंची अदलाबदल करण्यासाठीच्या Transfer Window ला मान्यता मिळण्याचे संकेत आहेत.

जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण??

फुटबॉल लिग संस्कृतीप्रमाणेच, आयपीएलचा हंगाम मध्यावर आलेला असताना सर्व संघमालाकांना खेळाडूंची अदलाबदल करण्याची संधी मिळते. गेल्या हंगामात Uncapped खेळाडूंसाठी ही सुविधा गव्हर्निंग काऊन्सिलने दिली होती. मात्र यासाठी ज्या खेळाडूची अदलाबदल होणार आहे, त्याने आपल्या मूळ संघाकडून दोन किंवा अधिक सामने खेळलेले नसावेत ही अट घालण्यात आलेली होती. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांचा पाठींबा असतानाही संघमालकांनी या सुविधेचा फायदा घेतला नाही.

आगमी हंगामासाठी करण्यात आलेले बदल…

आगामी हंगामात Uncapped खेळाडूंप्रमाणेच Capped खेळाडूंची अदलाबदल करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र ज्या खेळाडूंची अदलाबदल करण्यात येणार आहे, त्यासाठीची रक्कम ही संघमालकाला आपल्या ठरवून देण्यात आलेल्या रकमेतून न देता, दुसऱ्या मार्गाने द्यायची आहे. म्हणजेच संघमालकांना यासाठी आपल्या लिलावातून उरलेल्या पैशांचा वापर करता येणार नाहीये.