आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव, १९ डिसेंबरला कोलकाता शहरात पार पडला. सुमारे ३०० पेक्षा अधिक खेळाडूंवर या लिलावात बोली लागली. काही खेळाडूंना अनपेक्षितपणे कोट्यवधी रुपये मिळाले तर काहींचा भ्रमनिरास झाला. याचसोबत स्थानिक भारतीय खेळाडूंचंही नशिब या लिलावात उजळलं. मुंबईच्या तुषार देशपांडेला दिल्ली कॅपिटल्स संघाने अखेरच्या फेरीत २० लाखांची बोली लावत आपल्या संघात दाखल करुन घेतलं.
स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबईच्या संघाकडून खेळणाऱ्या तुषार देशपांडेने आपली छाप पाडली आहे. रणजी क्रिकेट असो किंवा सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धा, तुषारने आपल्या भेदक माऱ्यामुळे प्रतिस्पर्धी फलंदाजला आपल्या तालावर नाचवलं. मात्र आयपीएलमध्ये त्याला अद्याप संधी मिळाली नव्हती. तेराव्या हंगामात अखेरच्या फेरीत दिल्लीने मुंबईकर तुषारवर बोली लावत त्याला आपल्या संघात घेतलं. यावेळी आयपीएल सामन्यांदरम्यान बॉलबॉय ते थेट दिल्लीच्या संघाचं तिकीट…या प्रवासाबद्दल तुषारने Sportskeeda या इंग्रजी संकेतस्थळाला मुलाखत दिली.
“माझ्यावर बोली लागेल असा मला विश्वास होता, स्थानिक क्रिकेटमध्ये मी चांगली कामगिरी करत आलोय. मात्र पहिल्या फेऱ्यांमध्ये कोणीही बोली न लावल्यामुळे मी निराश झालो. मी नेमका कुठे कमी पडतोय हेच मला समजत नव्हतं. मी त्यादरम्यान थोडासा निराश झालो होतो. मात्र ज्यावेळी दिल्लीने माझ्यावर बोली लावली, त्यावेळी माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. मी सोफ्यावरुन उडी मारली आणि थेट माझ्या आजीला मिठी मारली. यानंतर मी बाबांना फोन करुन माझी निवड झाल्याचं सांगितलं, त्यांनाही प्रचंड आनंद झाला.”
२००८ साली तुषारने बॉलबॉय म्हणून मुंबई इंडियन्सकडून सुरुवात केली. यावेळी सचिन, सनथ जयसूर्या यासारख्या खेळाडूंना सराव करताना पाहणं ही वेगळी पर्वणी असायची असं तुषारने सांगितलं. काही महिन्यांपूर्वी तुषारच्या आईचं निधन झालं. मात्र यावेळीही तुषारने खचून न जाता क्रिकेटकडे लक्ष देण्याचं ठरवलं. या काळात आपल्याला वडिलांनी खूप आधार दिल्याचं तुषारने आवर्जून सांगितलं. यादरम्यान रिकी पाँटींगच्या मार्गदर्शनाखाली खेळण्यात उत्सूक असल्याचंही तुषार म्हणाला. दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज डेल स्टेन हा तुषारचा आदर्श आहे. त्यामुळे आगामी काळात तुषारला दिल्ली कॅपिटल्स संघात जागा मिळते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.