आयपीएलच्या तेराव्या हंगामाची अधिकृत घोषणा अखेरीस बीसीसीआयने केली आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात युएईमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. केंद्र सरकारने या स्पर्धेसाठी बीसीसीआयला मान्यता दिली असून…करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता सर्व संघांना कडक नियम आखून देण्यात आले आहेत. २० ऑगस्टनंतर सर्व संघांना युएईला रवाना होण्याची परवानगी देण्यात आली आहे. चेन्नई सुपरकिंग्जच्या खेळाडूंसाठी संघाने चेन्नईत एका छोटेखानी कँपचं आयोजन केलं आहे. या कँपसाठी संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी रांचीवरुन चेन्नईला रवाना झाला आहे.

सोशल मीडियावर धोनी आपल्या गाडीतून रांची विमानतळावर दाखल झाल्याचा व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहे.

२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर धोनी वर्षभर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. आयपीएलच्या तेराव्या हंगामातून धोनी क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करणार होता. परंतू करोनामुळे स्पर्धा स्थगित झाल्यामुळे त्याचं पुनरागमन लांबणीवर पडलं होतं. अखेरीस या स्पर्धेला मुहूर्त मिळाल्यामुळे आपल्या लाडक्या धोनीला मैदानात पाहण्याची चाहत्यांची इच्छा पूर्ण होणार आहे.