आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं बिगुल अखेरीस वाजलेलं आहे. गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात २९ मार्चरोजी सलामीचा सामना रंगणार आहे. मार्च महिन्यात भारतीय संघ घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ वन-डे सामन्यांची मालिका खेळेल. १८ मार्चरोजी कोलकात्यात तिसरा वन-डे सामना खेळवल्यानंतर बरोबर ११ दिवसांनी आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात होणार आहे.

तेराव्या हंगामात शनिवारी Double Header सामन्यांची संख्या कमी करण्यात आलेली असून, संपूर्ण हंगामात केवळ ५ Double Header सामने खेळवले जाणार असून ते रविवारी खेळवले जातील. मात्र या स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच मुंबई इंडियन्सने विक्रमी कामगिरी करत चेन्नई सुपरकिंग्जला मागे टाकलं आहे.

आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात खेळण्याची मुंबई इंडियन्सची ही सातवी वेळ ठरणार आहे. याआधी कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांनी प्रत्येकी ६ वेळा आयपीएलचा पहिला सामना खेळला आहे. २९ मार्चला मुंबईचा संघ चेन्नई आणि कोलकात्याला मागे टाकणार आहे.

१७ मे रोजी विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ मुंबई इंडियन्सविरुद्ध अखेरचा साखळी सामना खेळणार आहे.