आयपीएलच्या आगामी हंगामात राजस्थान रॉयल्सचा संघ आपल्या नवीन मैदानावर सामने खेळणार आहे. गुवाहटी शहरातील बारसापरा मैदान हे राजस्थान रॉयल्सचं आगामी हंगामातलं घरचं मैदान असणार आहे. आसाम क्रिकेट संघटनेचेच सचिव देवजित लोन आणि राजस्थान रॉयल्सचे मालक मनोज बदाले यांनी याविषयीची घोषणा केली. राजस्थान रॉयल्स घरच्या मैदानावरचे ३ सामने गुवाहटी शहरात खेळणार आहे.

राजस्थान रॉयल्सच्या संघ प्रशासनाने गुवाहटीत काही सामने खेळण्याची परवानगी मागितली होती. आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलने राजस्थान संघाची ही विनंती मान्य केल्याचं समजतंय. बारसापरा क्रिकेट मैदानावर २०१७ साली भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला टी-२० सामना खेळवला गेला होता. यानंतर २०१८ साली भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात एक वन-डे सामनाही गुवाहटीच्या मैदानावर खेळवला गेला होता. राजस्थान रॉयल्सच्या या निर्णयामुळे इशान्येकडील राज्यांत आयपीएलचा प्रसार होण्यास मदत होणार आहे.

Story img Loader