ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जाय रिचर्डसन (Jhye Richardson) वर आयपीएल लिलावात मोठी बोली लागली आहे. या वेगवान गोलंदाजाला पजांब संघानं १४ कोटी रुपयांची बोली लावत आपल्या ताफ्यात घेतलं आहे. रिचर्डसनची मूळ किंमत एक कोटी ५० लाख रुपये इतकी होती. लिलावादरम्यान आरसीबी आणि दिल्ली या संघानेही रिचर्डसनवर बोली लावली. मात्र, अखेर पंजाब संघानं १४ कोटी रुपयांची बोली लावत त्याला विकत घेतलं.
आयपीएलच्या लिलावातील सर्वात महागड्या खेळाडूंपैकी रिचर्डसन एक आहे. या आधी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला कोलकातानं १५.५ कोटी रुपयांना खरेदी केलं होतं. आयपीएलच्या गेल्या हंगामात कमिन्सनं १४ सामन्यात फक्त १२ बळी घेतले होते. नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग स्पर्धेत रिचर्डसन यानं अफलातून कामगिरी केली होती. या स्पर्धेत त्यानं २९ बळी घेतले होते. बिग बॅशमधील ५३ सामन्यात रिचर्डसन यानं ६९ बळी घेतले आहेत.
टी-२० मध्ये तीन वेळा चार बळी –
रिचर्डसन ऑस्ट्रेलियासाठी दोन कसोटी सामने खेळला असून यामध्ये ६ बळी घेतले आहेत. १३ एकदिवसीय सामन्यात २४ बळी मिळवले आहेत. याशिवाय ९ टी-२० सामन्यात ९ बळी मिळवले आहेत. आतापर्यंत ६२ देशांतर्गत टी-२० सामन्यात खेळाला आहे. यामध्ये ७८ विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान त्यानं तीन वेळा चार बळी घेण्याची किमया साधली आहे.
दुखापतीमुळे विश्वचषकाचं स्वप्न भंगलं –
२०१७ मध्ये रिचर्डसनने यानं आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केलं होतं. आपल्या वेगवान गोलंदाजीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. भविष्यातील स्टार खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात होतं. २०१९ च्या विश्वचषकाच्या संघात रिचर्डसनच स्थान पक्कं मानलं जात होतं. मात्र तो दुखापतग्रस्त झाला अन् संघातील स्थान गमावावं लागलं. त्यानंतर अॅशेजमालिकेलाही त्याला मुकावं लागलं होतं.