आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा यूएईमध्ये सुरू आहे. कोलकाता नाईट रायडर्सने मंगळवारी ४१ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. या सामन्यादरम्यान रवीचंद्रन अश्विन आणि ईऑन मॉर्गन यांच्यातील वादाची बरीच चर्चा रंगली होती. कोलकाताचा गोलंदाज टिम साऊदीने अश्विनला तंबूत धाडले, त्यानंतर अश्विनची पहिल्यांदा साऊदीशी आणि त्यानंतर केकेआरचा कप्तान मॉर्गनशी बाचाबाची झाली. या घटनेवर अनेकांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या. आता ऑस्ट्रेलियन मीडियाने अश्विनवर टीका करत त्याला भारताचा ‘खलनायक’ म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियन वृत्तसंस्था फॉक्स क्रिकेटने अश्विनच्या या बाचाबाचीचा उल्लेख करताना त्याला भारताचा खलनायक असे म्हटले. भारताच्या खलनायकाने खेळभावनेला तडा दिला, असा उल्लेख फॉक्स क्रिकेटने केला. त्यांनी दिग्गज फिरकीपटू शेन वॉनने केलेल्या ट्वीटचा संदर्भ देत या घटनेला ‘बदनामीकारक’ असेही म्हटले. याआधी आयपीएलमध्ये अश्विनने मंकडिंग पद्धतीने राजस्थानचा फलंदाज जोस बटलरला बाद केले होते. तेव्हाही त्याच्या या कृतीवर विविध प्रतिक्रिया समोर आल्या होत्या.

आयपीएलमधील या बाचाबाचीनंतर शेन वॉर्नने एक ट्वीट केले. त्याने अश्विनवर टीका करत म्हटले, ”या विषयावर आणि अश्विनवर जगाची विभागणी होऊ नये. हे अगदी सोपे आहे, हे बदनामीकारक आहे आणि असे कधीही होऊ नये. अश्विनला पुन्हा तो माणूस का व्हावे लागले? मला वाटते मॉर्गनला त्याला बोलण्याचा पूर्ण अधिकार होता,”

हेही वाचा – ‘त्याला’ संघात आणणे म्हणजे इतर कोणालाही कमी लेखणे नव्हे – बीसीसीआय

नक्की काय घडले?

मंगळवारी दिल्ली कॅपिटल्स आणि केकेआर यांच्यातील सामन्यात अश्विन आणि साऊदी यांच्यात पहिल्या डावाच्या शेवटच्या षटकादरम्यान वाद झाला. त्याचवेळी, अश्विन आऊट झाल्यानंतर पॅव्हेलियनच्या दिशेने जाऊ लागला, तेव्हा केकेआरचा कर्णधार इऑन मॉर्गन काहीतरी बोलला, त्यानंतर अश्विन रागाने मॉर्गनच्या दिशेने जाऊ लागला. या दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. नंतर केकेआरचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने हस्तक्षेप केल्यानंतर वाद मिटला.

Story img Loader