मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मंगळवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जवर सहा गडी आणि सहा चेंडू राखून विजय मिळवला. या विजयासहीत पाच वेळा स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबईच्या संघाने प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा कायम ठेवल्या आहेत. मुंबईचे तीन सामने शिल्लक असून उर्वरित तिन्ही सामने जिंकल्यानंतर त्यांचा प्लेऑफमधील प्रवेश निश्चित मानला जात आहे. दरम्यान वर्ल्ड कप टी-२० संघात स्थान मिळालेल्या सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांचा फॉर्म सध्या चिंतेचा विषय ठरला आहे. वर्ल्डकपसाठी निवड झाल्याने सूर्यकुमार यादव आणि इशान किशनला आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी खेळताना धावांची भूक दिसत नसल्याचं वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा माजी खेळाडू ब्रायन लाराने म्हटलं आहे.
सूर्यकुमार यादव आणि इशान किशन सध्या आक्रमक दिसत नसल्याचं सांगताना ब्रायन लाराने पाच वेळा चॅम्पियन ठरलेल्या मुंबईने पुन्हा एकदा प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी या दोघांनी फॉर्ममध्ये येण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. सूर्यकुमार यादव आणि इशान किशनची खेळी सध्या चिंतेचा विषय ठरत आहे. मुंबई इंडियन्सचे महत्त्वाचे खेळाडू मानले जाणारे सूर्यकुमार आणि इशान मोठी खेळी करण्यात अयशस्वी ठरत आहेत.
युएईमध्ये पुन्हा एकदा आयपीएलला सुरुवात झाल्यापासून सूर्यकुमार यादव एकदाही दोन अंकी धावसंख्या करु शकलेला नाही. श्रीलंकेत चांगल्या फॉर्ममध्ये असणारा सूर्यकुमार यादव यावेळी चार सामन्यांमध्ये ०,८,५,३ इतक्याच धावा करु शकला आहे.
IPL 2021 Playoffs: मुंबईने विजय मिळवला पण…; पाहा कोणते संघ निश्चित अन् कोणते तळ्यात मळ्यात
मंगळवारी मुंबई इंडियन्सने खराब फॉर्ममध्ये असणाऱ्या इशान किशनला पंजाबविरोधातील सामन्यात विश्रांती दिली. सूर्यकुमारला संधी देण्यात आली होती, पण रवी विष्णोईच्या गुगलीवर तो शून्यावरच बाद झाला.
“भारतीय संघात झालेली निवड मूळ समस्या असू शकते. अनेक खेळाडू यामुळेच माघार घेत शांत बसले असावेत,” असं ब्रायन लाराने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हटलं. “भारतीय संघ जास्त महत्वाचा असू शकतो. पण इथे तुमचं ब्रेड आणि बटर आहे. आयपीएलमध्ये खेळूनच तुम्हाला ही संधी मिळाली आहे. सूर्यकुमार, इशान किशन आणि तिवारीकडे पाहिलं असता तो त्यांच्यापेक्षा जास्त भुकेला (धावांसाठी) दिसतो,” असं त्याने सांगितलं आहे.
“या लोकांनी अजून थोडं प्रोफेशनल होण्याची गरज असून आपल्या संघाला स्पर्धेत टिकवून ठेवलं पाहिजे. वर्ल्ड कप विसरा, मुंबई इंडियन्सला पुन्हा एकदा स्पर्धेत आणणं तुमचं काम आहे,” असं ब्रायन लाराने म्हटलं आहे.
मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मंगळवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जवर सहा गडी आणि सहा चेंडू राखून विजय मिळवला. किरॉन पोलार्डची अष्टपैलू चमक (नाबाद १५ धावा आणि २ बळी) आणि हार्दिक पंडय़ा (नाबाद ४०), सौरभ तिवारी (४५) यांच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे मुंबईला हा विजय मिळवता आला. या विजयासहीत पाच वेळा स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबईच्या संघाने प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा कायम ठेवल्या आहेत. मात्र केवळ या विजयावर मुंबईला समाधान मानता येणार नाही. आता मुंबईचे तीन सामने शिल्लक असून उर्वरित तिन्ही सामने जिंकल्यानंतर त्यांचा प्लेऑफमधील प्रवेश निश्चित मानला जात आहे. मात्र मुंबईची इतर तीन संघाशी चौथ्या जागेसाठी चुरशीची लढत होण्याचं चित्र सध्याच्या पॉइण्ट्स टेबलवरुन दिसत आहे.