आयपीएलच्या १४ व्या हंगामात, गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा प्रवास संपला आहे. संघाने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध विजय नोंदवला, पण १७१ धावांनी विजय मिळवण्याचे कठीण काम ते पूर्ण करू शकले नाहीत. २०१८ नंतर रोहितचा संघ आयपीएलच्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरला आहे. यूएईच्या मैदानावर मुंबईची कामगिरी बरीच निराशाजनक होती. मुंबईच्या संघाला फक्त तीन सामन्यांमध्ये विजय मिळता आला आहे. आयपीएल २०२१ मधून बाहेर पडल्यानंतर संघाचा कर्णधार रोहित शर्माने आपल्या ट्विटर हँडलवर खेळाडूंसाठी एक खास संदेश देऊन त्यांना प्रोत्साहन दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“चढ -उतार आणि शिकण्याने भरलेला हंगाम. पण, हे १४ सामने या संघाने गेल्या दोन ते तीन वर्षांत मिळवलेले वैभव हिरावून घेऊ शकत नाहीत. निळा आणि सुवर्ण रंग परिधान केलेला प्रत्येक खेळाडू अभिमानाने खेळला आणि त्याने आपला सर्वोत्तम खेळ केला. आणि हिच कामगिरी आपल्याला संघ बनवते जे आपण आहोत.. एक कुटुंब,” असा संदेश रोहितने मुंबईच्या संघाला दिला आहे.

मुंबईच्या फलंदाजांनी संघाला प्लेऑफमध्ये नेण्यासाठी आणि आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या उभारण्यासाठी पूर्ण ताकद लावली. इशान किशन ८४ आणि सूर्यकुमार ८२ च्या झंझावाती खेळीच्या बळावर मुंबईने ९ गडी गमावून २३५ धावा केल्या. मात्र, अंतिम चारमध्ये स्थान मिळवण्यासाठी मुंबईला हैदराबादला फक्त ६५ धावांवर बाद करावे लागणार होते.

इशान किशनने हैदराबादविरुद्ध फलंदाजी करताना अवघ्या १६ चेंडूत आपले अर्धशतक झळकावले आणि चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. मुंबईने फक्त ८ षटकांत १०० धावांचा आकडा पार केला. सूर्यकुमारने अबू धाबीमध्ये शेवटच्या षटकांमध्येही धिंगाणा घातला आणि ४० चेंडूत ८२ धावा केल्या. हैदराबादच्या फलंदाजांनीही २३६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ८ गडी गमावून १९३ धावा केल्या. २०१९ आणि २०२० मध्ये मुंबई इंडियन्सने सलग वर्षे आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2021 captain rohit sharma special message mumbai indians players abn