दुबईच्या मैदानावर रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्जचा ३ गडी राखून पराभव केला आणि गुणतालिकेत अग्रस्थानी झेप घेतली. नाणफेक जिंकलेल्या दिल्लीच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजीचा नजराणा पेश करत चेन्नईला २० षटकात ५ बाद १३६ धावांवर रोखले. चेन्नईचे स्टार फलंदाज अपयशी ठरल्यानंतर अंबाती रायुडू आणि महेंद्रसिंह धोनी यांनी अर्धशतकी भागीदारी उभारली. रायुडूने नाबाद अर्धशतक ठोकले. प्रत्युत्तरात खेळणाऱ्या दिल्लीने शंभर धावांच्या आत आपले सहा फलंदाज गमावले. त्यानंतर मोक्याच्या क्षणी चेन्नईने स्फोटक फलंदाज शिमरोन हेटमायरला जीवदान दिले आणि दिल्लीने हा सामना आपल्या नावावर केला. दिल्लीकडून १८ धावांत २ बळी घेणाऱ्या अक्षर पटेलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. चेन्नईविरुद्धच्या विजयासह दिल्लीच्या खात्यात आता २० गुण झाले आहेत.
दिल्लीचा डाव
चेन्नईच्या छोटेखानी धावसंख्येचा पाठलाग करताना पॉवरप्लेमध्ये दिल्लीने सलामीवीर पृथ्वी शॉला गमावले. चेनन्नईचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने त्याला झेलबाद केले. शॉने १८ धावा केल्या. पहिला गडी बाद झाल्यानंतर शिखर धवनने कोणताही दबाव न घेता फटकेबाजी केली. चहरने टाकलेल्या पाचव्या षटकात धवनने २१ धावा चोपल्या. पुढच्याच षटकात दिल्लीने अर्धशतक पूर्ण केले, पण त्यांना श्रेयस अय्यरला गमवावे लागले. ६ षटकात दिल्लीने २ बाद ५१ धावा केल्या. नवव्या षटकात रवींद्र जडेजाच्या चेंडूवर मोठा फटका खेळताना ऋषभ पंत झेलबाद झाला.पंतने १५ धावा केल्या. त्यानंतर पदार्पणवीर फलंदाज रिपाल पटेलने (१८) थोडा प्रतिकार केला. पण १३व्या षटकात जडेजाने त्याला तंबूत पाठवले. रिपाल बाद झाल्यानंतर रवीचंद्रन अश्विनला बढती मिळाली होती. पण शार्दुल ठाकूरने त्याचा त्रिफळा उडवला. याच षटकात शार्दुलने खेळपट्टीवर स्थिरावलेल्या धवनला बाद करत दिल्लीच्या अडचणी वाढवल्या. धवनने ३ चौकार आणि २ षटकारांसह ३९ धावा केल्या. ९९ धावांत दिल्लीचे ६ फलंदाज तंबूत परतले. त्यानंतर शिमरोन हेटमायर आणि अक्षर पटेलने भागीदारी केली. ड्वेन ब्राव्होने टाकलेल्या १८व्या षटकात हेटमायरला जीवदान मिळाले. कृष्णप्पा गौतमने त्याचा सोपा झेल सोडला शिवाय चौकारही दिला. शेवटच्या षटकात दिल्लीला विजयासाठी ६ धावांची गरज होती, .या षटकात ब्राव्होने अक्षरला बाद करत सामन्याची रंगत वाढवली. पण त्यानंतर आलेल्या कगिसो रबाडाने चौकार खेचत दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. हेटमायरने २ चौकार आणि एका षटकारासह नाबाद २८ धावा केल्या.
चेन्नईचा डाव
मागच्या सामन्यात शतकी खेळी केलेला ऋतुराज गायकवाड आणि फाफ डु प्लेसिस यांनी चेन्नईच्या डावाची सुरुवात केली. त्यांनी वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्कियाच्या पहिल्याच षटकात १६ धावा ठोकल्या. आक्रमक झालेल्या डु प्लेसिसला फिरकीपटू अक्षर पटेलने बाद करत चेन्नईला पहिला धक्का दिला. डु प्लेसिस १० धावा करू शकला. त्यानंतर रॉबिन उथप्पा चेन्नईसाठी पहिला सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. पाचव्या षटकात नॉर्कियाने ऋतुराजला आपल्या जाळ्यात फसवले. मोठा फटका खेळण्याच्या नादात ऋतुराज झेलबाद झाला. ऋतुराजला १३ धावा करता आल्या. पॉवरप्लेमध्ये चेन्नईने २ बाद ४८ धावा केल्या. मधल्या फळीतील मोईन अलीलाही मोठी खेळी करता आली नाही. अक्षरने त्याला आठव्या षटकात झेलबाद केले. पुढच्याच षटकात अश्विनने उथप्पाला आपल्याच गोलंदाजीवर झेलबाद केले. उथप्पाने १९ धावा केल्या. त्यानंतर दिल्लीच्या वेगवान गोलंदाजांनी धोनी आणि रायुडूला फटकेबाजी करू दिली नाही. १७व्या षटकात चेन्नईने शतकी टप्पा ओलांडला. पुढच्याच षटकात दोघांनी आपली अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. १९व्या षटकात रायुडूने अर्धशतक पूर्ण केले. दिल्लीचा गोलंदाज आवेश खानने शेवटच्या षटकात धोनीला झेलबाद केले. धोनीने २७ चेंडूत १८ धावांची संथ खेळी केली. आवेशने या षटकात ४ धावाच दिल्या. चेन्नईने २० षटकात ५ बाद १३६ धावा केल्या. रायुडूने ५ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ५५ धावांची खेळी केली.
हेही वाचा – IPL 2021 : “सनरायझर्स हैदराबादचे फलंदाज म्हणजे झोपेच्या…”, वीरेंद्र सेहवागचा हल्लाबोल!
दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन
चेन्नई सुपर किंग्ज – महेंद्रसिंह धोनी (कप्तान आणि यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, फाफ डु प्लेसिस, मोईन अली, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, जोश हेझलवूड.
दिल्ली कॅपिटल्स – ऋषभ पंत (कप्तान आणि यष्टीरक्षक), पृथ्वी शॉ, शिखर धवन, रिपाल पटेल, श्रेयस अय्यर, शिमरॉन हेटमायर, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, कगिसो रबाडा, आवेश खान, एनरिक नॉर्किय़ा.