आयपीएल २०२१ स्पर्धेच्या प्लेऑफच्या सामन्यात दिल्लीने चेन्नईसमोर विजयासाठी १७३ धावांचं आव्हान दिलं आहे. दिल्लीने ५ गडी गमवून २० षटकात १७२ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना पहिल्याच षटकात फाफ डु प्लेसिस त्रिफळाचीत झाला. त्यानंतर ऋतुराज गायकवाड आणि रॉबिन उथप्पा यांनी संघाचा डाव सावरला. रॉबिन उथप्पाने अर्धशतकी खेळी केली. तर ऋतुराजने सावध खेळी करत रॉबिनला चांगली साथ दिली.उथप्पा बाद झाल्यानंतर ऋतुराजनही अर्धशतक झळकावलं.
खेळपट्टी दोन्ही खेळाडूंचा जम बसल्यानंतर दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतनं संघाचं आठवं षटक आर. अश्विनला सोपवलं. या षटकात आर. अश्विननं चौथा चेंडू टाकताना फक्त अॅक्शन केली, मात्र चेंडू टाकला नाही. पुढच्याच चेंडूवर ऋतुराज फलंदाजीसाठी तयार झाला. पण अश्विन चेंडू टाकणार इतक्यात तो बाजूला झाला. मैदानावरील हे दोघांचे द्वंद्व चांगलेच व्हायरल होत आहे.
याआधी दिल्ली कॅपिटल्स आणि केकेआर यांच्यातील सामन्यात अश्विन आणि साऊदी यांच्यात पहिल्या डावाच्या शेवटच्या षटकादरम्यान वाद झाला होता. अश्विन आऊट झाल्यानंतर पॅव्हेलियनच्या दिशेने जाऊ लागला, तेव्हा केकेआरचा कर्णधार इऑन मॉर्गन काहीतरी बोलला, त्यानंतर अश्विन रागाने मॉर्गनच्या दिशेने जाऊ लागला. या दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. नंतर केकेआरचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने हस्तक्षेप केल्यानंतर वाद मिटला होता.