इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२१चा पहिला क्वालिफायर सामना आज १० ऑक्टोबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज आणि ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघ आमनेसामने असतील. आज हे गुरू-शिष्य मैदानात पाऊल ठेवताच स्वत:साठी मोठा विक्रम नोंदवतील.

नाणेफेक करण्यासाठी ऋषभ पंत जेव्हा मैदानात उतरेल, तेव्हा तो आयपीएलचा प्लेऑफ सामना खेळणारा सर्वात युवा कर्णधार बनेल. ऋषभ पंत २४ वर्ष ६ दिवसांचा आहे. आतापर्यंत हा विक्रम त्याच्याच संघाच्या श्रेयस अय्यरच्या नावावर आहे. अय्यर २५ वर्षे १० महिने २९ दिवस असे वय असताना आयपीएलचा प्लेऑफ सामना खेळणारा कप्तान ठरला होता.

हेही वाचा – T20 World Cup : भारत-पाकिस्तान सामना कोण जिंकणार?; शाहिद आफ्रिदी म्हणतो…

पंतसह धोनीही एक विक्रम करणार आहे. वयाच्या ४०व्या वर्षी प्लेऑफ सामन्यात संघाचे नेतृत्व करणारा धोनी दुसरा खेळाडू बनेल. त्याच्या आधी राहुल द्रविडने २०१३ मध्ये आपल्या नावावर ही कामगिरी केली होती. चेन्नई सुपर किंग्जने २०१०, २०११ आणि २०१८ मध्ये आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. त्यांनी आयपीएलमध्ये ११व्या वेळी अंतिम-४ मध्ये स्थान मिळवले आहे. चेन्नई संघाने आठ वेळा आयपीएलचा अंतिम सामना खेळला आहे.