ऋतुराज गायकवाड (७०) आणि रॉबिन उथप्पा (६३) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमधील ‘क्वालिफायर-१’ सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर चार गडी आणि दोन चेंडू राखून मात केली. अखेरच्या षटकात १३ धावांची आवश्यकता असताना कर्णधार महेंद्रसिंह धोनीने (नाबाद १८) करनच्या गोलंदाजीवर तीन चौकार मारत चेन्नईला विजय मिळवून दिला.
धोनी रविंद्र जाडेजा आणि ब्राव्होच्या आधी फलंदाजीला आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. मात्र धोनीने संघाला आपल्या खास शैलीमध्ये विजय मिळवून दिल्यानंतर त्याच्या या छोट्या पण महत्वाच्या खेळीवरुन अनेकांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केलाय. विशेष म्हणजे भारतीय संघाचा कर्णधार आणि प्लेऑफमधील बंगळुरु संघाचं नेतृत्व करणाऱ्या विराटनेही धोनीच्या या खेळीनंतर एक नाही तर दोन ट्विट केली. मात्र या दोनपैकी एकच ट्विट सध्या चाहत्यांना दिसत आहे. कोहलीने केवळ एका शब्दासाठी आधी केलेलं आणि काही मिनिटांमध्ये १६ हजारांहून अधिक रिट्विट झालेल्या या ट्विटचे स्क्रीनशॉर्ट सध्या व्हायरल झाले आहेत.
आता दिसत असणारं ट्विट काय?
“आणि राजा परत आलाय. या खेळातील सर्वकालीन सर्वोत्तम फिनिशर आहे तो. त्याने आज मला पुन्हा बसल्या जागेवर उडी मारण्यास भाग पाडलं”, असं कोहलीने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. म्हणजेच सामना फारच रोमांचक झाला आणि धोनीची फलंदाजी पाहून आनंद झाला असं कोहलीला यामधून म्हणायचं होतं. कोहलीनं केलेलं हे ट्विट ११ वाजून ४८ मिनिटांचं आहे.
मात्र त्यापूर्वी कोहलीने ११ वाजून ३९ मिनिटांनी एक ट्विट केलं होतं. मात्र या ट्विटमध्ये एक खास शब्द टाकायला विसरल्याने कोहलीने हे ट्विट अवघ्या काही मिनिटांमध्ये १६ ते १७ हजारांहून अधिक जणांनी रिट्विट केल्यानंतरही डिलीट केलं. झालं असं की विराटच्या आताच्या ट्विटमध्ये, “Anddddd the king is back the greatest finisher ever in the game,” असं वाक्य आहे. पण त्याने आधी केलेल्या ट्विटमध्ये धोनीचा उल्लेख करताना एव्हर हा शब्द वापरला नव्हता. म्हणजे कोहलीने आधी केलेल्या ट्विटमध्ये. “Anddddd the king is back the greatest finisher in the game,” असं म्हटलं होतं. त्यामुळेच त्याने एव्हर म्हणजेच सर्वकालीन हा शब्द टाकण्यासाठी ट्विट डिलीट केलं आणि तो शब्द वापरुन पुन्हा ट्विट केलं.
सध्या कोहलीच्या आधीच्या आणि आताच्या ट्विटचा फोटो व्हायरल झालेत. धोनीबद्दल असणारा आदर आणि धोनी कसा महान आहे हे दाखवण्यासाठी कोहलीने केलेली ही कृती पाहून अनेक धोनी चाहत्यांनी कोहलीचं कौतुक केलंय. तर कोहली सारखा जगात भारी खेळाडूही केवळ धोनीसाठी संपूर्ण ट्विट डिलीट करुन त्याच्या सन्मानार्थ एक शब्द टाकण्यासाठी परत ट्विट करतो हे पाहून अनेकांना आश्चर्य वाटलंय.
विराट हा फॅनबॉय
आधीचं आणि नंतरचं ट्विट
फक्त एका शब्दासाठी परत ट्विट
आयपीएलमध्ये आज विराटच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात ‘एलिमिनेटर’चा सामना रंगणार आहे. या लढतीत पराभूत संघाचे आव्हान संपुष्टात येणार असल्याने दोन्ही संघांतील खेळाडू विजयासाठी सर्वस्व पणाला लावतील.