आयपीएल २०२१ स्पर्धेत पंजाबनं चेन्नईला ६ गडी आणि ६ षटकं राखून पराभूत केलं. या विजयासह पंजाबचे गुणतालिकेत १२ गुण झाले असून पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. असं असलं तरी साखळी फेरीतील पंजाबचे सर्व सामने संपले असून कोलकाता आणि मुंबई यांचे प्रत्येकी एक सामना उरला आहे. त्यामुळे दोन्ही संघांनी सामना गमवल्यास कोलकाता, मुंबई, राजस्थान आणि पंजाबचे प्रत्येकी १२ गुण होतील आणि धावगतीवर चौथ्या संघाची प्लेऑफमध्ये निवड होईल.
पंजाबचा डाव
चेन्नईने विजयासाठी दिलेल्या १३५ धावांचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात चांगली झाली. पहिल्या गड्यासाठी केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी ४६ धावांची भागीदारी केली. मात्र मयंक अग्रवाल वैयक्तिक १२ धावांवर असताना शार्दुल ठाकुरच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्यानंतर लगेचच सरफराज खानच्या रुपाने पंजाबला दुसरा धक्का बसला. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. शार्दुल ठाकुरच्या गोलंदाजीवर फाफने त्याचा झेल घेतला. त्यानंतर आलेला शाहरुख खानही मैदानावर तग धरू शकला नाही. ८ धावा करून तंबूत परतला. तीन गडी बाद झाल्यानंतरही कर्णधार केएल राहुलने एकट्याने किल्ला लढवला. त्याने या सीझनमधलं सहावं अर्धशतक झळकावलं. केएल राहुलने ४२ चेंडूत ९८ धावा केल्या. या खेळीत ७ चौकार आणि ८ षटकारांचा समावेश आहे. एका बाजुला कर्णधार केएल राहुलची फटकेबाजी सुरु असताना चौथा गडी बाद झाला. एडन माक्रम १३ धावा करून बाद झाला.
चेन्नईचा डाव
चेन्नईच्या डावाची सुरुवात अडखळत झाली. संघाच्या १८ धावा असताना पहिला गडी बाद झाला. ऋतुराज गायकवाडच्या रुपाने पहिला धक्का बसला. अर्शदीपच्या गोलंदाजीवर शाहरूख खानने त्याचा झेल घेत तंबूचा रस्ता दाखवला. ऋतुराजने १४ चेंडूत १२ धावा केल्या. यात एका चौकाराचा समावेश आहे. त्यानंतर मोइन अलीही मैदानात जास्त तग धरू शकला नाही. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. त्यानंतर रॉबिन उथप्पाही कमाल करू शकला नाही. ख्रिस जॉर्डनच्या गोलंदाजीवर हरप्रीत ब्रारनं त्याचा झेल घेतला. अंबाती रायडुही झटपट बाद झाला. ख्रिस जॉर्डनच्या गोलंदाजीवर अर्शदीपने त्याचा झेल घेतला. अंबाती रायडुने ५ चेंडूत ४ धावा केल्या. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी पुन्हा एकदा मोठी धावसंख्या उभारण्यास अपयशी ठरला. रवि बिष्णोईच्या गोलंदाजीवर त्याचा त्रिफळा उडाला. धोनीने १५ चेंडूत १२ धावा केल्या. फाफ डुप्लेसिस आणि रवींद्र जडेजाने चेन्नईचा डाव सावरला. फाफनं ५५ चेंडूत ७६ धावांची खेळी केली. या खेळीत ८ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. मोहम्मद शम्मीच्या गोलंदाजीवर फटका मारताना झेल बाद झाला.
चेन्नईने आपल्या संघात कोणताही बदल केलेला नाही. पंजाबने आपल्या संघात एक बदल करत ख्रिस जॉर्डनला स्थान दिलं आहे. पंजाब संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे. पंजाबचे गुणतालिकेत १३ सामन्यात १० गुण आहेत. अशात सामना जिंकत शेवट गोड करण्याचा पंजाबचा प्रयत्न असणार आहे
प्लेईंग इलेव्हन
चेन्नईचा संघ- महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), फाफ डुप्लेसिस, मोइन अली, अंबाती रायडु, रॉबिन उथप्पा, रवींद्र जडेजा, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकुर, दीपक चाहर, जोश हेझलवूड
पंजाबचा संघ- केएल राहुल (कर्णधार), मयंक अग्रवाल, एडेन मक्रम, सरफराज खान, शाहरूख खान, मोजेस हेनरिक, हरप्रीत ब्रार, ख्रिस जॉर्डन, मोहम्मद शमी, रवी बिष्णोई, अर्शदीप सिंह