आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने सलग दुसरा विजय नोंदवला आहे. शारजाहच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात चेन्नईने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ६ गड्यांनी मात दिली. नाणेफेक जिंकलेल्या धोनीने विराटसेनेला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. दमदार सुरुवात केलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शेवटच्या पाच षटकात विकेट्स गमावत चेन्नई सुपर किंग्जला विजयासाठी १५७ धावांचे आव्हान दिले आहे. वाळूच्या वादळामुळे नाणेफेकीला उशीर झाला. नाणेफेकीलाचा कौल धोनीच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या छोट्या मैदानावर प्रेक्षकांना चौकार-षटकारांचा पाऊस पाहायला मिळेल, अशी शक्यता आधीपासूनच वर्तवण्यात येत होती. विराट-देवदत्तने अर्धशतकी खेळ्या करत १११ धावांची दमदार सलामीही दिली. पण हे दोघे माघारी परतल्यानंतर आरसीबीचे उर्वरित स्टार फलंदाज मोठे फटके खेळू शकले नाहीत. चेन्नईने शेवटच्या पाच षटकात त्यांना केवळ २५ धावा दिल्या. त्यामुळे उत्तम सुरुनवातीनंतरही त्यांनी चेन्नईसमोर १५७ धावांचे आव्हान ठेवता आले. प्रत्युत्तरात चेन्नईने अर्धशतकी सलामी आणि मधल्या फळीतील महत्त्वपूर्ण भागीदाऱ्यांमुळे बंगळरूच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला. बंगळुरूच्या धावसंख्येला लगाम घालणाऱ्या चेन्नईच्या ड्वेन ब्राव्होला सामनावीर पुरस्कार मिळाला.
चेन्नईचा डाव
आरसीबीच्या आव्हानाचा पाठलाग करताना सीएसकेच्या फाफ डु प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड या सलामीवीरांनी उत्तम सुरुवात केली. पॉवरप्लेपर्यंत या दोघांनी संघासाठी ५९ धावा केल्या. आरसीबीचा फिरकीपटू यजुर्वेंद्र चहलने नवव्या षटकात ऋतुराजला बाद करत चेन्न्नईला पहिला धक्का दिला. ऋतुराजने ३८ धावा केल्या. फिरकीला मदत मिळतानाचे पाहून विराटने चेंडू मॅक्सवेलकडे सोपवला, त्याने दुसरा सलामीवीर डु प्लेसिसला नवदीप सैनीकरवी झेलबाद केले. डु प्लेसिसने ३१ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या अंबाती रायुडू आणि मोईन अली यांनी संघाची नौका शंभर धावांच्या पार पोहोचवली. पर्पल कॅपचा मानकरी असलेल्या हर्षल पटेलने आधी मोईन अलीला (२३) त्यानंतर १६व्या षटकात ३२ धावांची खेळी केलेल्या रायुडूला बाद केले. रायुडूने आपल्या खेळीत ३ चौकार आणि एक षटकार लगावला. त्यानंतर मैदानात आलेल्या महेंद्रसिंह धोनी आणि उपकर्णधार सुरेश रैना यांनी १९व्या षटकात चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
बंगळुरूचा डाव
चेन्नईचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने टाकलेल्या पहिल्या षटकात विराट कोहलीने दोन आणि देवदत्त पडिक्कलने एक चौकार ठोकत बंगळुरूला उत्तम सुरुवात करून दिली. विराट आणि देवदत्तने आक्रमक अंदाजात फटकेबाजी केली. त्यांनी चहरसह, शार्दुल ठाकूर आणि रवींद्र जडेजावरही हल्लाबोल चढवला. ६ षटकांच्या पॉवरप्लेमध्ये या दोघांनी संघासाठी ५५ धावा फलकावर लावल्या. १२व्या षटकात देवदत्तने चहरला चौकार खेचत वैयक्तिक अर्धशतक आणि संघाचे शतक फलकावर लावले. १३व्या षटकात विराटने आपले अर्धशतक पूर्ण केले. १४व्या षटकात ड्वेन ब्राव्होने विराटला जडेजाकरवी झेलबाद करत आरसीबीला पहिला धक्का दिला. विराट आणि देवदत्त यांनी १११ धावांची दमदार सलामी दिली. विराटने ६ चौकार आणि एका षटकारासह ५३ धावांची खेळी केली. विराट बाद झाल्यावर बंगळुरूची धावगती मंदावली. शार्दुल ठाकूरने सलग चेंडूंवर डिव्हिलियर्स आणि देवदत्तला माघारी धाडले. देवदत्तने ५ चौकार आणि ३ षटकारांसह ७० धावा केल्या. त्यानंतर आलेला ग्लेन मॅक्सवेल आणि पदार्पणवीर टिम डेव्हिड हे फलंदाजही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. शेवटच्या पाच षटकात त्यांना केवळ २५ धावा करता आल्या. त्यामुळे आरसीबीला २० षटकात ६ बाद १५६ धावांपर्यंतच पोहोचता आले. चेन्नईकडून ब्राव्होने किफायतशीर गोलंदाजी करत २४ धावांत ३ बळी घेतले.
हेही वाचा – थरारनाट्यच..! विजय मिळाला म्हणून टीम इंडियाच्या खेळाडूंनी केला जल्लोष, इतक्यातच पंचांनी…
दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन
चेन्नई सुपर किंग्ज – फाफ डु प्लेसिस, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी, ड्वेन ब्राव्हो, शार्दुल ठाकूर, दीपक चहर आणि जोश हेझलवूड.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, केएस भरत, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, टिम डेव्हिड, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, यजुर्वेंद्र चहल आणि नवदीप सैनी.