दिल्ली कॅपिटल्स

* कर्णधार : ऋषभ पंत</p>

* सर्वोत्तम कामगिरी  : उपविजेतेपद (२०२०)

* मुख्य आकर्षण : पृथ्वी शॉ

प्रामुख्याने युवा खेळाडूंसह संघबांधणी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सला २०१९मध्ये ‘क्वालिफायर-२’मध्ये पराभव पत्करावा लागला. तर गतवर्षी त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यातच कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतीमुळे यंदाच्या संपूर्ण हंगामाला मुकणार असल्याने स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच दिल्लीच्या चिंतेत भर पडली आहे. मात्र कारकीर्दीतील सर्वोच्च शिखरावर असलेल्या ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली हा संघ या वेळी जेतेपदाचा वेध घेऊ शकतो. दिल्लीचे सुरुवातीचे सामने मुंबईत होणार असल्याने विजय हजारे करंडक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या पृथ्वी शॉकडून त्यांना फार अपेक्षा आहेत. त्याशिवाय शिखर धवन, स्टीव्ह स्मिथ, अजिंक्य रहाणे यांच्या अनुभवाचाही दिल्लीला लाभ होईल. कॅगिसो रबाडा आणि आनरिख नॉर्किए ही दक्षिण आफ्रिकन वेगवान गोलंदाजांची जोडी दिल्लीची ताकद असून त्यांना रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल या लयीत असलेल्या भारतीय फिरकीपटूंची साथ लाभेल.